माजी मंत्री तानाजी सावंत यांना धक्का; भैरवनाथ शुगर्स कारखान्यावर कारवाईचे आदेश
माढा : माजी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याशी संबंधित भैरवनाथ ‘शुगर’ वर्क्स लि., आलेगाव (ता. माढा) या कारखानाने २ कोटी ९५ लाख रुपयांची एफआरपी थकवल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी ‘आरआरसी’ (रेन्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट) कारवाई करण्याचे आदेश याबाबत साखर आयुक्तांनी दिले आहेत.
साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ यांनी दिलेल्या आदेशानुसार, ऊस (नियंत्रण) आदेश, १९६६ चे कलम ३ (८) अन्वये भैरवनाथ शुगर वर्क्स लि. आलेगाव या साखर कारखान्याकडील सन २०२४-२५ च्या हंगामामधील गाळप ऊसाचे थकित एफआरपी रक्कम २ कोटी ९५ लाख नऊ हजार आहेत. तसेच कलम ३ (३ ए) नुसार सदर रकमेवर १५ टक्के दराने देय होणारे व्याज या कारखान्याकडून जमीन महसुलाची थकबाकी समजून कारखानाने उत्पादित केलेली साखर, मोलॅसिस आणि बगॅस आदी उत्पादनाची विक्री करून त्यामधून रक्कम वसूल करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, साखर साठा बँकेकडे तारण असल्यास तारण नसलेली कारखान्याची जंगम व स्थावर मालमत्ता जप्त करून मालमत्तेवर दस्तऐवजामध्ये ‘शासनाच्या’ नावाची नोंद घ्यावी, सदर मालमत्तेची जप्ती करून त्याची विहित पद्धतीने विक्री करून ऊस (नियंत्रण) आदेश, १९६६ मधील तरतुदीनुसार देयबाकी रकमेची खात्री करून विलंबित कालावधीसाठी १५ टक्के व्याजासह अदा करण्यास सांगितले आहे. जिल्हाधिकारी सोलापूर यांना ऊस (नियंत्रण) आदेश १९६६ चे कलम ३ (९) नुसार कारवाई करण्यास प्राधिकृत करण्यात येत आहे, असे आदेशात म्हटले आहे.