Shinde faction MLA Sada Saravankar's statement regarding development funds has turned political.
Maharashtra Politics : मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे अनेक आमदार हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेमध्ये असतात. आता शिंदे गटाचे माजी आमदार सदा सरवणकर यांचे वक्तव्य चर्चेत आले आहे. सत्ताधारी नेते आणि विरोधी आमदार यांना मिळणाऱ्या निधीवरुन अनेकदा वादंग निर्माण झालेला दिसून येतो. पण आमदार नसूनही सदा सरवणकर यांना मिळणाऱ्या निधीबाबत वक्तव्य केल्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. यावरुन ठाकरे गटाच्या नेत्यांनी जोरदार खडेबोल सुनावले आहेत.
शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार सदा सरवणकर म्हणाले की, पराभूत जरी झालो असलो तरी आपल नेतृत्व म्हणजे मुख्यमंत्रीसाहेब आणि एकनाथ शिंदे साहेब माझ्यामागे सक्षम आहेत. याअगोदर देखील आमदारांच्या निधीबद्दल आमदारांनी तक्रार केली होती. प्रत्येक बिल्डिंगमध्ये मी काम केली पण काम केल्याने पराभव होतो, हा माझा अनुभव आहे. पण, काम न करणारे जिंकून येतात, तेही फक्त जाती पातीवर जिंकून येतात, अशा शब्दांत सदा सरवणकर यांनी त्यांच्या पराभवाबद्दल मनातील खदखद व्यक्त करुन दाखवली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी निधीबाबत केलेल्या वक्तव्यावरुन चर्चा रंगली आहे. ते म्हणाले की, “मी आमदार नसताना मला 20 कोटी मिळतात. मी सगळीकडे उदघाटन करताना दिसतोय कारण आपला पिंड हा कामाचा आहे,” असे सदा सरवणकर म्हणाले आहेत. मात्र त्यांना आमदार नसताना मिळणाऱ्या निधीवरुन वाद निर्माण होत आहे. सदा सरवणकर यांच्या वक्तव्यावर आमदार महेश सावंत यांनी जोरदार पलटवार केला आहे.
माजी आमदारांना खैरात वाटली जाते
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत म्हणाले की, “20 ते 40 वर्षे इथे सत्ता गाजवली, त्यांच्यापेक्षा कोणीच मोठा नाही अशी त्यांची भावना होती. मात्र जनतेने त्यांचा भ्रम दूर केला. लोकांनी घरी बसण्याचा सल्ला दिलेला असताना देखील 20 कोटींचा निधी त्यांना मिळाला. माजी आमदारांना खैरात वाटली जाते, मानधन बंद झालंय मग स्वतःचा विकास कसा होणार, असा सवाल आमदार महेश सावंत यांनी उपस्थित केलाय. तसेच, हा वैयक्तिक विकासाचा निधी आहे,” असा टोलाही महेश सावंत यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे महेश सावंत म्हणाले की, ‘शिंदेंच्या मर्जीतले आमदार असल्यामुळे त्यांना निधी वाटप होतोय, ही पद्धत चुकीची आहे. त्यांना 20 कोटी मिळतात मग आम्हाला 40 कोटी निधी देण्यात यावा. आत्तापर्यंत त्यांना वेगवेगळ्या कामांसाठी 500 कोटींचा निधी मिळाला, मग हे सगळे पैसे गेले कुठे? विधानसभा अध्यक्ष तसेच मुख्यमंत्र्यांकडे आपण याबाबत तक्रार करणार आहोत. माहिम, दादर, माटुंगा आणि प्रभादेवी येथील जनतेचा हा अपमान आहे. ज्याला जनतेने निवडून दिले त्याला निधी न देता दुसऱ्याला निधी देणे ही मतदारांची घोर निराशा आहे,” असे स्पष्ट मत आमदार महेश सावंत यांनी व्यक्त केले.