'आमदार-खासदार बनवण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, आता त्यांच्यासाठी...'; संजय गायकवाड यांची इच्छा (फोटो -सोशल मीडिया)
बुलढाणा : स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. नेते, पुढाऱ्यांनी कार्यकर्त्यांना बळ देऊन मोठे केले पाहिजे. कार्यकर्त्यांसाठी महायुतीने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक एकत्र लढावावी, अशी इच्छा शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केली.
बुलढाणा येथील ओंकार लॉन्स येथे शनिवारी (दि.20) जिल्हा परिषद, पंचायत समिती व दसरा मेळावा नियोजन बैठक आमदार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. ते पुढे बोलताना म्हणाले की, महायुतीत सर्वच घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आम्हाला आमदार, खासदार बनवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. आता त्यांच्या निवडणुकीची वेळ आली असताना त्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. विकासकामांच्या माध्यमातून बुलढाणा शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम केले. याच कामाच्या बळावर बुलढाणेकर महायुतीला २२ ते २४ जागा मिळवून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेदेखील वाचा : Laxman Hake Viral Audio Clip : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी घेतली लाच…? दिला ड्रायव्हरचा UPI ID, ऑडिओ होतोय व्हायरल
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक शिवसेनेच्या विजयासाठी निर्णयक आहेत. कार्यकर्त्यांनी जनतेशी संपर्क ठेवत पक्षाची विचारधारा पोहचवावी. दसरा मेळावा शिवसेनेच्या शक्तीचा आणि परंपरेचा उत्सव असून, प्रत्येकाने यामध्ये सहभागी व्हावे. बंजारा व धनगर समाजाच्या आरक्षणाला सर्वांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन आमदार गायकवाड यांनी केले.
स्वराज्य पक्ष निवडणुकीच्या रिंगणात?
संभाजीराजे छत्रपती यांचा पक्ष निवडणुकीत उतरणार का यावर त्यांनी भाष्य केले होते. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक विषयांवर भाष्य केले होते. “इतके फटके बसलेत त्यातून बाहेर पडणे अवघड आहे. त्यामुळे स्वराज्य पक्षाने निवडणूक लढवणे असे काही अद्याप ठरवलेले नाही. आमच्याकडून ज्या काही चुका झाल्या त्या दुरुस्त करू. निवडणूक लढवण्यापेक्षा लोकांना आपल्याकडून काय अपेक्षा आहेत हे पाहणे महत्त्वाचे आहे. या दृष्टिकोनातून विचार विनिमय सुरू आहे,” अशी भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी यापूर्वीच घेतली आहे.