Shivsena samana target akhil bhartiya sahitya sammelan for political interfernce
मुंबई : दिल्लीमध्ये अखिल मराठी साहित्य संमेलन सुरु आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यामधील राजकीय जवळीक पाहून ठाकरे गटाने रोष व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही दिवसांपूर्वी महादजी शिंदे पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामुळे देखील ठाकरे गट नाराज झाला होता. आता शिवसेना ठाकर गटाचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रामधून दिल्लीच्या साहित्य संमेलनावर आणि उपस्थितांवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे.
काय आहे अग्रलेखामध्ये?
शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना च्या अग्रलेखामध्ये मराठी साहित्य संमेलनावर निशाणा साधण्यात आला आहे. यामध्ये लिहिण्यात आले आहे की, “दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. देशाच्या राजधानीत संमेलन होणे ही आनंदाचीच गोष्ट, पण साहित्यबाह्य उपस्थिती, राजकारण्यांचे सत्कार आणि अवांतर गोष्टींनी हे संमेलन चर्चेचा विषय ठरले. गेल्या पाच वर्षांत मुंबई-महाराष्ट्र ज्यांनी कमजोर केला असे सर्वच मानकरी साहित्य संमेलनाच्या मंचावर आणि मांडवात आहेत”, असा टोला सामनातून लगावण्यात आला.
“साहित्य संमेलने ही आता नित्याची बाब झाली आहे. मराठी साहित्यिक व कलावंत हे कोणतीही भूमिका धड घेत नाहीत आणि सरकारशी जुळवून घेण्यातच ते स्वत:ला धन्य मानतात. प्रश्न महाराष्ट्राच्या अस्मितेचा असो नाहीतर राष्ट्राच्या प्रतिष्ठेचा, महाराष्ट्राचे साहित्यिक आणि कलावंत पुढाकार घेऊन काहीच करत नाहीत. अशा सगळ्यांचे एक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे व त्याचे उद्घाटन आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 तारखेला केले. साहित्य संमेलनासारख्या सोहळ्यांचा राजकीय वापर कसा होतो हे दिल्लीतील संमेलनात पुन्हा दिसले”, अशी टीका करण्यात आली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“साहित्यबाह्य कामांनी हे संमेलन गाजत आहे. 21, 22, 23 फेब्रुवारीस हे संमेलन दिल्लीच्या ताल कटोरा मैदानावर सुरू आहे. त्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले ते विज्ञान भवनात. ताल कटोरात त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न होता. त्यामुळे उद्घाटनाची जागाच बदलली. महाराष्ट्राचे लेखक, कवी, ग्रंथ पोते, श्रोते यांच्यापासून आपल्या पंतप्रधानांना काय धोका असणार? दिल्लीतील साहित्य संमेलनात राजकारण्यांचीच भाऊगर्दी जास्त हे चित्र दिसले. दिल्लीत भाजपचे मंत्री व खासदार त्यात आघाडीवर. हे त्यांच्या घरचेच कार्य जणू होते. दिल्लीच्या संमेलनास आधी कोणी यायला तयार नव्हते. भाजपच्या संमेलनावरील आाढमणापुढे आपला निभाव लागेल काय?” असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“नहार यांनी संमेलन यशस्वी होण्यासाठी अपार मेहनत घेतली, पण संमेलनाआधी एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा घोळ घालून लोकांची नाराजी ओढवून घेतली. शिंदे यांना साहित्य संमेलनाच्या बॅनरखाली महादजी यांच्या नावाने पुरस्कार दिला याबाबत मराठी साहित्य महामंडळ अंधारात होते. महादजींचा पुरस्कार हा सरहद संस्थेचा व्यक्तिगत पुरस्कार. त्यामुळे तो कोणाला द्यायचा हा त्यांचा प्रश्न, पण एकनाथ शिंदे यांची कर्तबगारी काय? महादजी शिंदे हे दिल्लीपुढे झुकणारे नव्हते, तर दिल्लीचे तख्त राखणारे मराठा योद्धा होते. पानिपतच्या युद्धातही महादजी यांनी पराम गाजवला. महादजी यांनी दोनवेळा दिल्ली जिंकली. हा इतिहास पाहिला तर एकनाथ शिंदे हे पुरस्काराच्या प्रतिष्ठेत व चौकटीत कोठेच बसत नाहीत. त्यामुळे दिल्लीपुढे सतत झुकणाऱ्यांना व त्यास `उठाव’ किंवा `बंड’ म्हणणाऱ्यांना असे पुरस्कार देणे ही साहित्य संमेलनातली घुसखोरी आहे. एकाही साहित्यिकाने त्याचा निषेध केला नाही, पण जेथे संमेलनच राजकारण्यांच्या व सत्ताधाऱ्यांच्या हाती गेले तेथे दोष कोणाला द्यायचा!” अशी घणाघाती टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.