
Shivsena Thackeray Ambadas Danve reaction on Bihar Assembly Election 2025 Congress defeated
Bihar Assembly Elections Result 2025 : मुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष बिहार विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे. जोरदार प्रचार आणि टीका यानंतर दोन टप्प्यामध्ये मतदान पार पडले. यानंतर आता बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (दि.14) लागणार आहे. त्यासाठी सकाळपासून मतमोजणी सुरु असून यामध्ये सध्या तरी भाजपची असलेली NDA आघाडी ही प्रचंड मतांनी आघाडीवर आहे. यावर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीच कॉंग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.
बिहारमध्ये कॉंग्रेसच्या प्रचारानंतर आणि जोरदार आश्वासनांनंतर पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. बिहारच्या विधानसभा निवडणुकीवरुन महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा अंदाज लावला जात आहे. या निकालावरुन महाविकास आघाडीमधील शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अंबादास दानवे यांनी कॉंग्रेसवर जोरदार निशाणा साधला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी कॉंग्रेसला घरचा आहेर दिला. अंबादास दानवे म्हणाले की, पराभव झालेला मान्य आहे. भाजपने सत्तेचा गैरवापर केलाय. तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करायला वेळ लावला. त्यामुळं खूप उशीर झाला. काँग्रेस आणि आरजेडीने चुका केल्या. मतदार यादीत घोळ कायम आहेच. काँग्रेस जागावाटपामध्ये मोठा वाटा मागते. विजयाचे गणित आले की मोठा पराभव होतो, हे माझं मत स्पष्ट आहे. यामुळं नुकसान होते, अशा शब्दांत दानवे यांनी नाराजी व्यक्त केली.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
भाजप नेत्यांनी देखील कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. भाजप नेते आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. बावनकुळे म्हणाले की, काँग्रेस रोजच संपत आहे, राहुल गांधी हतबल झाले आहेत. फक्त मतदार यादीचे चुकीचे मुद्दे समोर करून वेळकाढूपणा करत आहे. विकासाचा कुठलाच अजेंडा त्यांच्याकडे नाही. धर्म, जात पंथाचे राजकारण करणे हेच काँग्रेसचे काम आहे. काँग्रेसच्या बुडत्या जहाजावर बसायला कोणी तयार नाही. काँग्रेसला जनतेने नाकारले आहे. काँग्रेसला बिहारमधून बाहेर काढले आहे. आगामी काळात काँग्रेस इतिहासातील सर्वात छोटा पक्ष होईल. असा घणाघात चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.