महाराष्ट्र भाजप चंद्रशेखर बावनकुळे यांची बिहार निवडणूक निकाल 2025 च्या एक्झिट पोल NDA च्या आघाडीवर प्रतिक्रिया दिली (फोटो - सोशल मीडिया)
Bihar Election Result 2025 :मुंबई : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. दोन टप्प्यामध्ये पार पडलेल्या मतदानाचा आज निकाल हाती येणार आहे. बिहार निवडणुकांचे कल समोर येण्यास सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यातील कलांमध्ये NDA ची ताकद वाढताना दिसत आहे. यावर महाराष्ट्रातील भाजप नेते देखील आनंद व्यक्त करत आहेत. भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार आणि मुख्यमंत्री पदाची धुरा कोण सांभाळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नितीशकुमार की तेजस्वी यादव कोण मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. बिहारमधील 243 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत NDA आणि महागठबंधन यांच्यात थेट टक्कर आहे, तर प्रशांत किशोरांच्या जन सुराज पक्षामुळे त्रिकोणी लढत रंगत आहे. याचा प्रभाव महाराष्ट्राच्या राजकारणातही पडत आहे. तर बिहार निवडणुकीच्या यशाने महाराष्ट्र भाजपचा विश्वास दुणावला असून भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी या निकालावर प्रतिक्रिया देत काँग्रेसवर सडकून टीका केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, बिहारच्या जनतेचे मी आभार मानतो. पंत्रप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलेल्या विकास कामावर मतदारांनी शिक्कामोर्तब केला आहे. विकास, विश्वास आणि विकसित भारतासाठी जनतेनं मतदान केलं आहे. एवढं मोठं बहुमत इतिहासात कधीच मिळालेल नाही, तेवढं मोठं बहुमत बिहारमध्ये मिळत आहे. संपूर्ण देशावरच बिहारच्या निकालाचे परिणाम होईल. हे काही हवेतले वातावरण नाही. तर जनतेचा आमच्यावर विश्वास आहे. महाराष्ट्रात 51% पेक्षा जास्त मते घेऊन आम्ही निवडणूक जिंकू. तर महायुती दोन तृतीयांश बहुमत घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक जिंकेल. असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या अपडेट जाणून घ्या
बावनकुळे यांनी कॉंग्रेसवर देखील भाष्य केले. ते म्हणाले की, काँग्रेस रोजच संपत आहे, राहुल गांधी हतबल झाले आहेत. फक्त मतदार यादीचे चुकीचे मुद्दे समोर करून वेळकाढूपणा करत आहे. विकासाचा कुठलाच अजेंडा त्यांच्याकडे नाही. धर्म, जात पंथाचे राजकारण करणे हेच काँग्रेसचे काम आहे. काँग्रेसच्या बुडत्या जहाजावर बसायला कोणी तयार नाही. काँग्रेसला जनतेने नाकारले आहे. काँग्रेसला बिहारमधून बाहेर काढले आहे. आगामी काळात काँग्रेस इतिहासातील सर्वात छोटा पक्ष होईल. असा घणाघात चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.






