स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच राजकीय पक्षांतराचे वादळ; एकामागोमाग अनेक नेते सोडत आहेत पक्ष
हिंगोली : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेता हिंगोली जिल्ह्याचे राजकीय केंद्र असलेल्या वसमतमध्ये पक्षांतराचे राजकीय वादळ उठले आहे. महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट व शिवसेना शिंदे गट यामध्ये अग्रेसर भूमिका निभावत आहे.
महाविकास आघाडीमधील प्रमुख पक्ष असलेल्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षातून सर्वात मोठी आउटगोइंग सुरु झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर झालेले राजकीय बदल मतदार कितपत स्विकारतील हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे. वसमत विधानसभा मतदारसंघ हा उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मात्र, राज्यस्तरावरील राजकीय भूकंपाने या दोन प्रमुख पक्षाचे चार पक्ष झाले.
परिणामी, या बदलांमुळे मतदारसंघासह गावपातळीवरील राजकीय समिकरण बदलले. विधानसभा निवडणुकीत राज्यात लाडकी बहिण योजनेने महायुतीला तारल्याची चर्चा सर्वदूर होती. आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे.
हेदेखील वाचा : Nilesh Rane on Malegaon blast : “आतंकवादाचा अन् जिहादाचा रंग हा हिरवाच…; मालेगाव बॉम्बस्फोट निकालानंतर नितेश राणे आक्रमक
वसमत मतदारसंघातील सर्कलसह वसमत नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून रणनीती आखली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून सदरील संस्थावर आपला झेंडा फडकवण्यासाठी मातब्बर आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते यांना आपल्या पक्षात घेऊन गड राखण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडीवर
राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट व शिवसेना शिंदे गट आघाडीवर आहे. त्यांनी कधीकाळी स्वपक्ष असलेल्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस व उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षासह इतर पक्षातून इन्कमिंग सुरु केली.
महायुतीमध्ये लागली प्रवेशाची चढाओढ
इतर पक्षांतील पदाधिकारी कार्यकर्ते यांना पक्षप्रवेश देण्याबरोबरच महायुतीमध्ये सत्तेत एकत्र असलेल्या भाजप रा. काँ., शिवसेना शिंदे गटामध्ये चढाओढ सुरू आहे.