ठाकरे बंधू मातोश्रीवर! सहाव्या भेटीतच युतीची चर्चा फायनल? (Photo Credit- X)
मुंबई: आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असताना, राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील वाढती जवळीक महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी आली आहे. गेल्या काही महिन्यांत दोन्ही नेत्यांच्या अर्धा डझन भेटी झाल्या असून, नुकतीच (रविवारी) मनसे प्रमुख राज ठाकरे सहकुटुंब उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर पोहोचले. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत तब्बल पावणेतीन तास चर्चा केली. विशेष म्हणजे, आठवड्याभरातील ही त्यांची दुसरी भेट आहे. या वाढत्या भेटींमुळे दोन्ही पक्ष आगामी महानगरपालिका निवडणूक एकत्र लढवणार असल्याच्या चर्चांना मोठे बळ मिळाले आहे.
मनसेचे (MNS) नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या वाढत्या भेटीगाठींवर सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. नांदगावकर म्हणाले की, “दोन्ही ठाकरे बंधूंच्या गाठीभेटी वाढताहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनाच याचा आनंद होणार आहे.” राजकीय युती अधिकृत होत नाही, तोपर्यंत त्यावर बोलणे उचित नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. मात्र, नांदगावकरांनी असेही संकेत दिले की, “त्या (युतीच्या) दृष्टीने वाटचाल सुरू झाली असावी,” असे ते म्हणाले.
बैठकीबद्दल माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे म्हणाले, “माझी आई माझ्यासोबत आहे आणि ही एक कुटुंब बैठक आहे.” त्यांनी ही बैठक पूर्णपणे दोन नेत्यांची नाही तर दोन भावांची बैठक म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला. तथापि, ही भेट अशा वेळी झाली जेव्हा मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुका जवळ येत आहेत. परिणामी, एकत्र येण्याच्या अटकळांना तीव्रता आली आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, २०२४ च्या निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरे बंधू आपल्या राजकीय अस्तित्वासाठी एकत्र येत आहेत. स्वतंत्रपणे निवडणूक लढल्यास दोघांचेही नुकसान होईल, याची जाणीव असल्याने बीएमसी निवडणुकीत युती करण्याबाबत दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युतीबाबतची चर्चा मोठ्या प्रमाणात पूर्ण झाली असून, केवळ अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. दोन्ही भाऊ आता महाराष्ट्रातील प्रत्येक निवडणूक एकत्र लढवण्याची तयारी करत असल्याचे मानले जात आहे.
‘दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना किमान एक लाख रुपये द्या’; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी