Ambadas Danve Target Eknath Shinde
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूका जाहीर केल्या आहेत. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी करुन निकाल येणार आहे. त्यामुळे सर्व पक्षांची जोरदार तयारी सुरु झाली आहे. यंदाची विधानसभा निवडणूक रंगणार असून बंडाचे राजकारण झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी पहिल्यांदा एकत्रित विधानसभेला समोरे जाणार आहेत. त्याचबरोबर राज्यात तिसरी आघाडी निर्माण झाली असून मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी एल्गार केला आहे. यामुळे राजकारण रंगले असून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
निवडणूका जाहीर झाल्यानंतर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शिंदे गटाला डिवचले आहे. अंबादास दानवे यांनी पोस्ट लिहिले आहे की, आताच दिल्लीच्या वजीराने मिंधे आणि त्यांच्या गटाला ‘त्याग’ शब्दाचे महत्व सांगितले म्हणे! खेळ सुरू झाला आहे..आता तत्व वगैरे सांगून शिंदे गटाच्या जागांची प्राथमिक छाटणी होईल.. मग येतील सर्व्हे.. मग येतील उमेदवार बदलायच्या अटी.. लक्षात ठेवा, शिंदे गटाला भाजप एक-एक जागेसाठी रडवणार! असा दावा अंबादास दानवे यांनी केला आहे.
आताच दिल्लीच्या वजीराने मिंधे आणि त्यांच्या गटाला ‘त्याग’ शब्दाचे महत्व सांगितले म्हणे!
खेळ सुरू झाला आहे..आता तत्व वगैरे सांगून शिंदे गटाच्या जागांची प्राथमिक छाटणी होईल.. मग येतील सर्व्हे.. मग येतील उमेदवार बदलायच्या अटी.. लक्षात ठेवा, शिंदे गटाला भाजप एक-एक जागेसाठी रडवणार!…— Ambadas Danve (@iambadasdanve) October 15, 2024
नेमकं प्रकरण काय?
जागावाटपाच्या बाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 100 पेक्षा कमी जागांवर तडजोड करण्यास तयार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अमित शाहांनी एकनाथ शिंदे यांना जागावाटपाच्या चर्चेत सौम्य भूमिका घेण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, या देशात पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री ही दोन पदे महत्त्वाची आहेत. गृहमंत्र्यांसह इतर सर्व पदे ही केवळ व्यवस्था आहे. काम पूर्ण करण्यासाठी ही यंत्रणा आहे. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिले, तुमच्यासाठी आमच्या लोकांना बलिदान द्यावे लागले, त्यामुळे तुमच्या मित्रपक्षांना जागा वाटप करून तुम्ही मोठे मन दाखवावे, असे अमित शाहांनी एकनाथ शिंदेंना सांगितल्याची माहिती आहे. यामुळे आता अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे. यावरुन अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.