
'राज्याच्या तिजोरीची चावी जनतेच्या हातात';
कराड : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रंगात असताना सत्ताधारी-विरोधकांकडून टीकाटिप्पणी सुरू असते. मात्र, राज्याच्या तिजोरीची चावी कोणत्याही नेत्याकडे नसून, ती पूर्णपणे जनतेकडे आहे; लोकशाहीत हा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी शासनव्यवस्थेतील जनतेच्या सर्वोच्च भूमिकेवर भर दिला.
यशवंतराव चव्हाण यांच्या ४१ व्या पुण्यतिथीनिमित्त प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ‘निधीच्या चाव्या’ संदर्भातील अलीकडील वक्तव्यांचा उल्लेख करताना त्या माध्यमांशी बोलत होत्या. सुळे म्हणाल्या, हिमालय अडचणीत असताना सह्याद्री धावून गेला होता. देशाचे माजी उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांचे योगदान कोणी विसरू शकत नाही. परंतु, त्यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाकडे प्रशासनाने यावर्षी केलेले दुर्लक्ष अत्यंत दुर्दैवी आहे.
तसेत त्या पुढे म्हणाल्या, ‘या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. सरकारे येतात-जातात, पण काही परंपरा पाळायलाच हव्यात. चव्हाण साहेबांचा योग्य मानसन्मान राखणे ही राज्याची जबाबदारी आहे’.
…ते कामात व्यस्त असतील
राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री अभिवादनाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याबाबत विचारले असता सुळे म्हणाल्या, ते कामात व्यस्त असतील, याबाबत माहिती नाही. परंतु प्रशासन मात्र वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरा पाळण्यास बांधील आहे. यावेळी प्रशासनाकडून झालेली चूक प्रकर्षाने जाणवते.
साताऱ्यात भाजपकडून उमेदवार ‘आयात’ करावा लागला
साताऱ्यात भाजपकडून उमेदवार ‘आयात’ करावा लागला, या शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना सुळे म्हणाल्या, टीका करणारे आधी कोणत्या पक्षात होते, हे त्यांनाच आठवत नाही. त्यांचा मूळ पक्ष मलाही नीट आठवत नाही, अशी खोचक टिपण्णीही त्यांनी केली. माथाडी नेते शशिकांत शिंदे यांनीही या पार्श्वभूमीवर विधान करत म्हटले, दोन्ही राजांच्या भूमिकेबद्दल मी बोलत नाही. पण एक महिला सक्षमपणे उभी असून, त्यांचे कर्तृत्व मोठे आहे. त्यामुळे जनताच योग्य कोण ते ठरवेल, असे मत व्यक्त केले.
हेदेखील वाचा : Local Body Election 2025 : लियाकत शाह यांच्या राजकीय हालचाली संशयास्पद! चिपळूणच्या राजकारणात घडतंय तरी काय?
परळीतील सभेत धनंजय मुंडेंनी आरोपी वाल्मिक कराडची आठवण काढल्याबाबत विचारले असता सुळे म्हणाल्या, ज्या व्यक्तींनी कोणाच्या तरी वडिलांची आणि महाराष्ट्राच्या एका लेकीची क्रूर हत्या केली, अशा लोकांची आठवण एखाद्या नेत्याला होत असेल, तर त्याचा जाहीर निषेधच केला पाहिजे.