चिपळूण : काँग्रेसच्या सर्व उमेदवारांचे अर्ज आम्ही व्यवस्थितपणे भरले होते. लियाकत शाह आपला उमेदवारी अर्ज दाखवण्यास तयार नव्हते. दरम्यान, लियाकत शाह यांनी नगराध्यक्ष पदासाठी भरलेल्या सुरुवातीच्या अर्जात त्रुटी आल्यावर दुसरा अर्ज भरतांना ‘एबी’ फॉर्म घेतला नाही. तेव्हा शाह यांच्या राजकीय हालचाली संशयास्पद वाटू लागल्या आणि काही पक्षाच्या हिताच्या दृष्टीने आपण निर्णय घेतले. यामुळेच चिपळूण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काँग्रेसचे ‘ हात’ चिन्ह निवडणूक रिंगणात राहिले आहे. आता आमचे काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुधीर शिंदे असून नगरसेवक पदाचे देखील उमेदवार आमच्या सोबत असल्याची स्पष्टोक्ती काँग्रेसच्या उत्तर रत्नगिरी जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली.
काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या राजकीय नाट्यमय घडामोडी नंतर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार लियाकत शाह यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर करत काँग्रेसच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग यांच्यासह सुरेश कातकर, रमेश कीर यांच्यावर आरोप केले होते. या आरोपात संदर्भात सोनललक्ष्मी घाग यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन काही खुलासे केले. यावेळी त्या म्हणाल्या की, लियाकत शाह यांना सुरुवातीपासूनच उमेदवारी अर्ज भरण्याबाबत दक्षता घेण्यासाठी सांगण्यात येत होते. मात्र, ते कोणाचेही ऐकत नव्हते. काँग्रेसच्या सर्व उमेदवारांचे अर्ज आम्ही पाहिले आहेत. परंतु, शाह यांनी भरलेले तिन्ही अर्ज आम्हाला एकदाही दाखवले नाहीत. तसेच सुरवातीच्या अर्जात त्रुटी दिसून आल्यानंतर दुसरा अर्ज भरताना त्यांना एबी फॉर्म घेण्यास सांगितले. मात्र, तो देखील त्यांनी घेतला नाही, असे सोनललक्ष्मी घाग यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी त्या पुढे म्हणाल्या की, काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या तर काँग्रेसचा चिन्ह ‘हात’ निवडणूक रिंगणात राहण्याच्या दृष्टीने आपल्यासाठी महत्वाचे होते. यामुळे आपण सुधीर शिंदे यांच्यासह त्यांच्या पत्नीला नगरसेवक पदासाठी पक्षातर्फे एबी फॉर्म दिला. तसेच शिंदे यांना नगराध्यक्ष पदासाठी ‘एबी’ फॉर्म दिला. ही बाब शिंदे यांच्यासह त्यांच्या अर्जाला सुचक असलेले त्यांच्या चिरंजीवांना फक्त माहिती होती, असे घाग यांनी यावेळी स्पष्ट केले. काँग्रेस नगराध्यक्ष पदाच्या निवडणुक रिंगणात राहणे आपल्या दृष्टीने महत्वाचे होते. तसे झाले नसते तर आपल्यालाच पक्षाला उत्तरे द्यावी लागली असती, असे सोनललक्ष्मी घाग यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुधीर शिंदे हे यापूर्वी काँग्रेसमध्येच होते. ते उपनगराध्यक्ष देखील राहिले आहेत. शिंदे यांना काँग्रेस नवीन नाही. तर काँग्रेसला शिंदे नवीन नाहीत, असे सांगतांना सुधीर शिंदे नगराध्यक्ष पदाचे योग्य उमेदवार आहेत. तोडीस तोड लढत देतील, असा आपल्याला विश्वास आहे, असे काँग्रेसच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी त्या आणखी पुढे म्हणाल्या की, लोकसभेला शिवसेना उबाठा तर विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला उमेदवारी मिळाली. यामुळे नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसला संधी मिळावी, अशी शाह यांची आग्रही भूमिका होती. तसेच आपले देखील म्हणणे होते. मात्र, शाह यांचे राजकारण अपक्ष असले तरी सर्वपक्षीय करताहेत. दहा वर्षांपूर्वी रमेश कदम यांच्या कारकिर्दीत झालेल्या कारभाराबाबत बोलत असत. परंतु, गेल्या आठ वर्षातील कारभाराबाबत त्यांच्याकडून कधीही वाच्यता झाली नाही, शाह यांच्या भूमिकेबाबत घाग यांनी नाराजी व्यक्त करीत काँग्रेस निवडणूक रिंगणात उतरली आहे. आम्ही ही निवडणूक जिंकणार, असा विश्वास काँग्रेसच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग यांनी यावेळी स्पष्ट केले.






