
उमेदवारी अर्ज ऑफलाईन पद्धतीनेच
मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुका अखेर जाहीर झाल्या आहेत. त्यामध्ये 15 जानेवारीला मतदान घेतले जाणार असून, 16 तारखेला मतमोजणी होऊन निकाल समोर येणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने मुंबईसह 29 महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. उमेदवारी अर्ज आता पारंपारिक पद्धतीने ऑफलाईन भरता येणार आहेत. तर मतदान ईव्हीएमवरच होणार असून, दुबार मतदारांवर करडी नजर असणार आहे.
कोरोनाचे संकट व ओबीसी आरक्षणाच्या पेचामुळे गेल्या चार ते पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात नगरपरिषदा व नगरपंचायतीची निवडणूक घेतल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने मुंबईसह २९ महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. उमेदवारी अर्ज आता पारंपारिक पद्धतीने ऑफलाईन भरता येणार आहेत. तर मतदान ईव्हीएमवरच होणार आहे. या निवडणुकीसाठी 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून, परंपरागत ऑफलाईन पद्धतीने प्रत्यक्ष जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करावे लागतील.
हेदेखील वाचा : Maharashtra Municipal Election: महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले; ‘या’ दिवशी होणार निवडणुका
दरम्यान, नगरपालिका निवडणुकीत ऑनलाईन अर्ज भरावे लागत होते व त्याबद्दल असंख्य तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे यावेळी महानगरपालिका निवडणुकीत पारंपरिकरित्या ऑफलाईन पद्धतीनेच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुभा देण्यात आली आहे. राखीव जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी अर्जासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते.
जातवैधता प्रमाणपत्र लागणार
जातवैधता प्रमाणपत्र जोडले नसल्यास जात पडताळणी समितीकडे जातवैधता प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा असा अर्ज केला असल्याचा अन्य कोणताही पुरावा देणे आवश्यक राहील. सहा महिन्यांच्या कालावधीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यात येईल, असे हमीपत्रदेखील संबंधित उमेदवारांना द्यावे लागेल.
निकालानंतर सहा महिन्यांत प्रमाणपत्र देणे गरजेचे
निकाल घोषित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या संबंधित उमेदवाराची निवड तात्काळ प्रभावाने रद्द होईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले.
नाव शोधण्यासाठी अॅपही आले
महानगरपालिका निवडणुकांसाठीच्या मतदार यादीतील मतदाराचे नाव, मतदान केंद्र आणि उमेदवारांविषयीमाहिती जाणून घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ‘मताधिकार’ हे मोबाईल अॅप उपलब्ध करून दिले आहे. ते सध्या फक्त ‘गुगल प्ले स्टोअर’वरून डाऊनलोड करता येईल. या अॅपद्वारे मतदाराचे नाव शोधण्यासाठी मतदाराला दोन पर्याय उपलब्ध आहेत. त्यानुसार मतदाराचे ‘संपूर्ण नाव’ किंवा ‘मतदार ओळखपत्रा’चा (ईपीआयसी) क्रमांक नमूद करून मतदार यादीतील नाव शोधता येईल. त्यानंतर जिल्हा आणि महानगरपालिकेच्या नावाची निवड केल्यानंतर आपले नाव दिसेल.