
'भाजपला कधी मिळाले नाही तेवढं यश नगरपरिषद निवडणुकीत मिळणार'; चंद्रशेखर बावनकुळेंचा विश्वास
नागपूर : राज्यातील नगरपरिषदांसह नगरपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण होत आहे. 24 नगरपरिषदांसाठी आज मतदान होत आहे. तर रविवारी (दि.20) मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जाणार आहेत. तत्पूर्वी भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. ‘उद्याचा निकाल भाजप आणि महायुतीसाठी विजयाचा दिवस असणार आहे. भाजपला कधी मिळालं नाही एवढं यश नगरपरिषद निवडणुकीत मिळणार आहे. जिथे आम्ही कधीच जिंकलो नव्हतो, त्या नगरपालिका ही आम्ही जिंकणार आहोत’, असेही त्यांनी म्हटले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘उद्याचा निकाल भाजप आणि महायुती करिता विजयाचा दिवस असणार आहे. भाजपला कधी मिळालं नाही, एवढं यश भाजपला नगरपरिषद निवडणुकीत मिळणार आहे. जिथे आम्ही कधीच जिंकलो नव्हतो, त्या नगरपालिका ही आम्ही जिंकणार आहोत. प्रचारामध्ये आम्ही पाहिलं मतदारांचा कल भाजपच्या बाजूने आहे म्हणून मोठा विजय होणार आहे. तसेच महायुती अनेक ठिकाणी राष्ट्रवादीसोबत नाही. अजित पवार यांना त्यांच्या पक्षाचे अधिकार आहे. त्यामुळे त्यांचा निर्णय सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, अजित पवार घेतील.
दरम्यान, महायुती आम्ही करत आहोत. मात्र, खूप मोठ्या संख्येने कार्यकर्ते अपेक्षा ठेवून आहे, त्यामुळे सर्वांना संधी मिळू शकत नाही. त्यामुळे काही ठिकाणी राष्ट्रवादी वेगळी लढेल. आमच्या मैत्रीपूर्ण लढत होईल. मात्र, त्यामुळे कटूता निर्माण होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ, असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.
मुंबई महायुती फायनल निर्णय
दोन दिवसांच्या आत मुंबईतील भाजप आणि शिवसेनेची कोअर कमिटी बसून अंतिम निर्णय करणार आहे. पहिल्या टप्प्यात शिवसेना व भाजपचे कोअर कमिटीचे मेंबर चर्चेसाठी बसत आहेत. जिथे कमी जागा आणि जास्त दावेदार आहे, तिथे काही अडचण आहे. मात्र, शेवटी निर्णय अजित पवार करणार आहे. त्यामुळे आम्ही त्याबद्दल काही बोलू शकत नाही, असे बावनकुळे यांनी सांगितले.
पुणे-पिंपरीमध्ये इन्कमिंग सुरु
आज पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या संख्येने इतर पक्षाचे कार्यकर्ते भाजपमध्ये येत आहे. ही इन्कमिंग होत असताना मला विश्वास आहे पुणे व पिंपरी-चिंचवड या ठिकाणी भाजपचा महापौर बसेल.
हेदेखील वाचा : Navi Mumbai News: नाईकांनी केली स्वबळावर लढण्याची गर्जना, नवी मुंबईतील युतीच्या घोषणेकडे लागले इच्छुकांचे डोळे