नगराध्यक्ष पद खुले असल्याने इच्छुकांची संख्या वाढणार
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील तीन नगरपालिकेचे नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले. अक्कलकोट नगरपालिकेचे नगराध्यक्षपद यंदा खुल्या प्रवर्गासाठी आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षातून इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. भाजप-महायुती व महाविकास आघाडी यांच्यात स्थानिक पातळीवर युतीमध्ये बिघाडी-बनाव झाल्यास बहुरंगी लढतीच्या दिशेने राजकीय व्यूहरचना गती घेण्याची शक्यता अधिक आहे.
‘वरून दोस्ती आतून कुस्ती’ या पद्धतीने अक्कलकोटमध्ये सध्या नगरपालिका व नगराध्यक्षपद निवडणुकीसंदर्भात चर्चा पाहावयास मिळत आहे. अक्कलकोट नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी सर्वात जास्त इच्छुकांची संख्या भाजपमध्ये आहे. विरोधी पक्ष याच संधीचा फायदा कितपत उचलतो आणि याला जनता कितपत प्रतिसाद देते, यावर भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षाचे भवितव्य अवलंबून आहे.
हेदेखील वाचा : बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर; 41 पैकी तब्बल 21 जागांवर महिलांना संधी
भारतीय जनता पार्टीचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी शासनाकडून कोट्यवधी रुपयांची विकासकामे मंजूर करून घेतली आहेत. यामुळे नगरपालिका निवडणुकीत निवडून येणाऱ्या नगराध्यक्षांना मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्याची संधी लाभणार आहे. यामुळे अक्कलकोट नगरपालिकेचे नगराध्यक्षपदासाठी यंदा इच्छुकांची संख्या अधिक आहे.
मिलन कल्याणशेट्टी यांचं नाव आघाडीवर
भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी सर्वात आघाडीवर नाव चर्चेत आहे ते म्हणजे नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांचं. सोशल मीडियावर नगराध्यक्ष पदासाठी सर्वात जास्त नाव चर्चेत व आघाडीवर आहे. भाजपमध्ये इच्छुकांमध्ये नगरसेवक महेश हिडोळे यांचे नाव इच्छुकमध्ये चर्चिले जात आहे.
हिंडोळे यांचे नाव आघाडीवर
मागील पंचवार्षिक नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी हिंडोळे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष शोभा खेडगी यांचे पुत्र नगरसेवक बसलीग खेडगी यांची नगरपालिका निवडणूक संदर्भात भूमिका महत्त्वाची ठरणार आहे अशी चर्चा व्यक्त होत आहे.
काँग्रेसकडून माजी नगराध्यक्ष अश्फाक बळोर्गी, नगराध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार मानले जातात. अक्कलकोट नगरपालिकेत भाजपचे वर्चस्व आहे. हे नगराध्यक्षपदासाठी थेट जनतेतून मतदान होणार असल्याने भाजपच्या विरोधात आघाडीकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्याची शक्यता नाकारता येत नाही. अक्कलकोटमध्ये अनेक नगरसेवकांचे नगराध्यक्ष निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. मात्र, अनेक वेळा ही संधी इच्छुकांकडून निसटून गेली आहे. येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत अनेक इच्छुकांचे चांगभलं होणार आहे, अशी चर्चा रंगली आहे.
अक्कलकोट व दुधनी नगरपालिका नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्ग व मैदर्गी नगरपालिका नगराध्यपद अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव झाले आहे. यामुळे अक्कलकोटमध्ये दिवाळीपूर्वीच राजकीय फटाके फुटण्यास प्रारंभ झाला आहे.