बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर; 41 पैकी तब्बल 21 जागांवर महिलांना संधी (फोटो - iStock)
बारामती : बारामती नगरपरिषदेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीतील नगरसेवक पदांसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत बुधवारी (दि.8) जाहीर करण्यात आली. यामध्ये अनेक महत्त्वाच्या ठिकाणी महिलांचे आरक्षण पडल्याने नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला. 41 जागांपैकी 21 जागांवर महिलांसाठी आरक्षण पडले.
नगरपरिषदेच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर आणि मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली. सोडतीच्या वेळी इच्छुक उमेदवार, राजकीय कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी गर्दी सभागृहात पाहायला मिळाली. तीन दिवसांपूर्वी बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर झाल्याने बारामती शहरातील अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे नगरसेवक पदाच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष होते. या सोडतीनुसार, बारामती नगरपरिषदेतील एकूण ४१ जागांपैकी तब्बल २१ जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.
हेदेखील वाचा : कराड नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी खुले आरक्षण; राजकीय मोर्चेबांधणीस सुरुवात, नागरिकांमध्ये उत्सुकता
आरक्षणानुसार, अनुसूचित जाती, मागासवर्गीय आणि सर्वसाधारण अशा सर्व गटांमध्ये महिलांना समान संधी देण्यात आली आहे. यंदाच्या सोडतीत सामाजिक न्यायाचे उत्तम संतुलन राखण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रमुख तपशील पुढीलप्रमाणे…
प्रभाग १ अनुसूचित जाती (महिला), प्रभाग २ मागास प्रवर्ग (महिला), प्रभाग ३ मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला, प्रभाग ४ मागास प्रवर्ग (महिला), प्रभाग ५ सर्वसाधारण महिला, प्रभाग ६ सर्वसाधारण महिला, प्रभाग ७ मागास प्रवर्ग (महिला), प्रभाग ८ मागास प्रवर्ग (महिला), प्रभाग ९ मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला, प्रभाग १० मागास प्रवर्ग (महिला), प्रभाग ११ सर्वसाधारण महिला, प्रभाग १२ अनुसूचित जाती (महिला), प्रभाग १३ व १४ अनुसूचित जाती (महिला), प्रभाग १५ मागास प्रवर्ग (महिला), प्रभाग १६ अनुसूचित जाती व सर्वसाधारण महिला, प्रभाग १७ मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला, प्रभाग १८ अनुसूचित जाती (महिला), प्रभाग १९ अनुसूचित जाती महिला, आणि प्रभाग २० अनुसूचित जाती, मागास प्रवर्ग (महिला), सर्वसाधारण (महिला).
हेदेखील वाचा : मेढ्यात नगराध्यक्षपदी ‘मी’ नाही तर आता ‘सौभाग्यवती’; गुडघ्याला बाशिंग बांधून बसणाऱ्या अनेकांचा भ्रमनिरास