
आमदार नारायण पाटील यांनी यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अधिकृत तुतारी चिन्हावर थेट न उतरता, ‘तालुका विकास आघाडी’ स्थापन करत सावंत गटासोबत युती करत आहे. स्थानिक राजकारणात स्वतंत्र भूमिका घेत पाटील यांनी आपल्या गटातील सर्व इच्छुकांना अर्ज दाखल करण्याचे निर्देश दिल्याने त्यांच्या गटाकडून मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेही १२ जागांवर थेट अधिकृत उमेदवार उभे केल्याने, पाटील गट, आघाडी आणि पक्षीय उमेदवार यांच्यातील समन्वयाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार, यावरच पाटील गटाची खरी कसोटी लागणार आहे.
माजी आमदार जयवंत जगताप यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक न लढवण्याचा आणि तटस्थ भूमिका घेण्याचा निर्णय जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ‘या निवडणुकीत जो उमेदवार योग्य वाटेल, त्याला सहकार्य करा,’ असे आवाहन त्यांनी समर्थकांना केले आहे. माघारीनंतर जगताप गटाचा कल नेमका कुणाकडे झुकतो, यावर अनेक गटांचे निकाल अवलंबून राहणार असल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप नेत्या, महिला आघाडीच्या प्रांतिक उपाध्यक्ष रश्मी बागल आणि माजी आमदार संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात फिफ्टी-फिफ्टी तत्त्वावर युती करण्यात आली आहे. महायुतीमुळे अनेक गटांत थेट सरळ लढतीऐवजी बहुपक्षीय सामना रंगणार असून, भाजप-राष्ट्रवादी एकत्र आल्याचा फायदा उमेदवारांना होईल, असा दावा युतीकडून केला जात आहे. मात्र, स्थानिक पातळीवरील बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान आहे.