
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रस्तावित आघाडी तुटली
पुणे : मुंबईत उद्धव ठाकरेंचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष या दोन्ही पक्षांमध्ये युती झाली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू महापालिका निवडणुकीच्या निमित्त एकत्र येत आहेत. त्यानंतर पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, यावर आता मोठी अपडेट समोर आली असून, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रस्तावित आघाडी तुटली आहे.
ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही नेत्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आगामी पुणे महापालिकेच्या पार्श्वभूमीवर आघाडी होणार असल्याचे म्हटले जात होते. त्यानुसार, अनेक चर्चाही सुरु होत्या. महाराष्ट्रात सध्या महापालिका निवडणुकांचे वारे वाहत आहेत. अशातच पुणे आणि पिपंरी चिंचवड महापालिकेत आपले वर्चस्व राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीच्या चर्चा सुरू आहेत. असे असतानाच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती फिस्कटल्याची माहिती आहे. निवडणूक कोणत्या चिन्हावर लढायची यावरून दोन्ही गटात मतभेद झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांची आघाडी होण्याआधीच तुटली आहे.
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अजित पवारांनी शरद पवारा़ंच्या पक्षाला अवघ्या 30 ते 35 जागा देऊ केल्यात आणि घड्याळ या चिन्हावर लढण्याची अट घातली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाचे अंकुश काकडे आणि विशाल तांबे हे शुक्रवारी रात्री झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीला हजर होते. त्यामुळे शरद पवारांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुन्हा महाविकास आघाडीत सहभागी होण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत आघाडीसाठी अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची शुक्रवारी बैठक पार पडली. या बैठकीत घड्याळ की तुतारी या चिन्हावर लढायचं, यावरून दोन्ही गटात वादाची ठिणगी पडली. कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची, यावर तोडगा न निघाल्यामुळे दोन्ही गटातील राष्ट्रवादीच्या संभाव्य आघाडीच्या चर्चा फिस्कटल्या आहेत.