Uday Samant advises Maratha leader Manoj Jarange Patil to exercise restraint while criticizing cm
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. महायुतीमधील अनेक नेते अजूनही नाराज असून पालकमंत्रिपदावरुन देखील राजकारण रंगले आहे. यामध्ये आता मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे पाटील यांनी राज्यभरामध्ये साखळी उपोषणाचा इशारा दिला आहे. यानंतर यावर आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जरांगे पाटील यांना सल्ला दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना संयम ठेवा, असे देखील उदय सामंत म्हणाले आहेत.
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. उदय सामंत म्हणाले की, ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय न होता जे दहा टक्के मराठी समाजाला आरक्षण दिलेले आहे. ते टिकले पाहिजे, मराठवाड्यातल्या कुणबी नोंदी ज्या निजामकालीन आहेत, त्यांना सर्टिफिकेट मिळाले पाहिजे. शिंदे समितीची मुदत वाढ करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. पण मला मनोज जरांगे यांना विनंती करायची आहे की, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सोबत बोलताना आपण थोडं संयम ठेवून बोलला पाहिजे, असे मत उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे उदय सामंत यांनी देवेंद्र फडणवीस हे लोकांनी निवडून दिलेले नेतृत्व आहे असे देखील सांगितले आहे. ते म्हणाले की, राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलताना संयम ठेवला पाहिजे. कारण ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. जनतेने त्यांना निवडून दिलेले आहे. कदाचित रागाच्या भरात अशा गोष्टी होऊ शकतात. पण त्यांनी सरकारशी संवाद ठेवावा, हे मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे. आंदोलन हा लोकशाहीचा भाग आहे. त्याच्याकडे सकारात्मक आणि आदराने बघितले पाहिजे. पण, तुम्ही संवाद देखील साधला पाहिजे. काही गोष्टींबरोबर गैरसमज करून न घेता सरकारशी संवाद ठेवण्याची गरज आहे, असे मत उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नेमकं प्रकरण काय?
मनोज जरांगे पाटील यांचे मेहुणे विलास खेडकर यांच्यासह ९ वाळू माफियांना तडीपार करण्यात आले आहे. रात्री उशिरा अंबड उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांनी हा आदेश दिला. तडीपार झालेल्या व्यक्तींवर अवैध वाळू उत्खनन, चोरी, जाळपोळ, जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण, तसेच सरकारी कामात अडथळा आणण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तडीपार करण्यात आलेल्या ९ आरोपींपैकी ६ जण हे मनोज जरांगे यांच्या आंदोलनात सक्रिय होते. या कारवाईमुळे मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला होता.
काय म्हणाले जरांगे पाटील?
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्ही मराठा आंदोलकांच्या केसेस मागे घेणार आहोत आणि दुसरीकडे मराठा आंदोलकांना नोटीस दिल्या जात आहेत. तुमचा दुसरा काही विषय असेल तर आम्हाला देणेघेणे नाही, आपली भूमिका कायम आहे. आमच्या सरळ स्वभावाचा फायदा तुम्ही उचलायचा नाही. तुम्ही अंतरवालीतील आंदोलकांना जर नोटीस देणार असाल, तुम्ही त्यांच्या पाठीमागे असे लागणार असेल तर फडणवीस साहेब मी सोडणार नाही. तुम्ही जर मराठ्यांना वेठीस धरायचं काम केलं तर, तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ लागणार नाही, असा इशारा त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला होता. यामुळे मंत्री उदय सामंत यांनी टीका करताना संयम ठेवावा असा सल्ला दिला आहे.