
'भविष्यात शहर विकास आघाडी निवडून आली की...'; उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास
सिंधुदुर्ग : नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. त्यानंतर विविध राजकीय पक्षांकडून या निवडणुका जिंकण्यासाठी तयारीही केली जात आहे. असताना आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावर भाष्य केले. ‘शहर विकास आघाडीला मिळणारा पाठिंबा बघता आमचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून येतील’, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्ग येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी आपल्या सगळ्या पदांचा राजीनामा दिला आहे. युती न झाल्याने जे अर्ज दाखल करता आले नाहीत. त्याचं काय करायचं म्हणून लोकांनी जी शहर विकास आघाडी केली आहे, त्याला मी आणि निलेश राणे यांनी पाठिंबा दिला आहे. शहर विकास आघाडीला मिळणारा पाठिंबा बघता आमचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून येतील’.
हेदेखील वाचा : बिहारनंतर आता ‘या’ दोन राज्यांतही NDA चेच सरकार ! अमित शाह यांचे मोठे भाकीत; ‘घुसखोरांना देशाबाहेर काढणारच!’
तसेच त्यांनी नितेश राणे यांच्याबाबतची विधान केले. ‘आम्हाला नितेश राणेंबद्दल आदर आहे. आम्ही कोणाच्या विरोधात नाही. कणकवलीकरांना शाश्वत विकास पाहिजे. नितेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात आम्ही इथे आलेलो नाही’, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, एका घरात 169 मते कशी असू शकतात याचा शोधच घेतला पाहिजे. मालवणमध्ये मराठा समाजाच्या व्यक्तीने अचानक ओबीसी समाजाचा दाखला घेतला. हा मराठा समाजाचा आणि ओबीसी समाजाचा अपमान आहे. तसेच, ज्यांच्यावर आरोप झालाय त्यांची चौकशी केली तर फरक पडत नाही. पालकमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांच्याविरोधात आम्ही एकत्र आलो नाही तर विकास करण्यासाठी एकत्र आलोय. भविष्यात शहर विकास आघाडी निवडून आली की विकासनिधी मागण्यासाठी पालकमंत्र्यांकडेच आम्ही जाणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.