Vasant more support ravindra dhangekar over jain boarding hostel murlidhar mohol case
Murlidhar Mohol News: पुणे : पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन प्रकरणी खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. शिवाजीनगर भागातील या जमीनीच्या विक्री प्रकरणावर सध्या स्टे आणण्यात आला आहे. मुंबईतील धर्मादाय आयुक्तालयामध्ये पार पडलेल्या सुनावणीमध्ये जैन समाजाला दिलासा मिळाला आहे. धर्मादाय आयुक्तांनी स्टेट स्टे म्हणजे परिस्थिती जैसे थे असे ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या प्रकरणावरुन खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आता त्यांना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांचा देखील पाठिंबा मिळत आहे.
“एक पुणेकर म्हणून मी रवींद्र धंगेकर यांच्या पाठीशी आहे”, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. धंगेकर यांची पाठराखण करत मोरे म्हणाले, सत्तेत असूनही ते एखादा विषय लावून धरत आहेत, त्याबद्दल त्यांचं कौतुक करायला हवं. रवींद्र धंगेकर एखादी खरी बाजू मांडत असतील तर तुम्ही ती स्वीकारायला हवी. ‘भटकी कुत्री’ किवा अन्य कुठलीही खालच्या पातळीवरील टीका करत असाल तर तुम्ही भाजपावाले लोक तुमची पात्रता दाखवत आहात असंच म्हणावं लागेल.” असे मत वसंत मोरे यांनी व्यक्त केले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढ ते म्हणाले की, “एखादी व्यक्ती खरं बोलत असेल तर तुम्ही ते ऐकलं पाहिजे. रवींद्र धंगेकर खोटं बोलत असते तर धर्मादाय आयुक्तांनी त्या व्यवहारावर स्थगिती दिली नसती. आयुक्तांनी स्थगिती दिली आहे याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरतंय. रवींद्र धंगेकर खरं बोलत असावेत. मी रवींद्र धंगेकर यांना ओळखतो. ते अभ्यासपूर्ण माहिती देतात. धंगेकर यांनी एखादा विषय हाती घेतला तर ते लावून धरतात. पुण्यातील एखादी व्यक्ती, एखाद्या पक्षाचा पदाधिकारी, या शहराचा नागरिक म्हणून शहरात शांतता राहावी यासाठी प्रयत्न करत असेल, शहरातील जमिनी कोणी बळकाऊ नये यासाठी प्रयत्न करत असेल तर आपण त्या व्यक्तीचं समर्थन केलं पाहिजे.” असे मत वसंत मोरे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
वसंत मोरे म्हणाले, “सदर जमीन ही जैन विद्यार्थ्यांसाठी आहे. त्या जागेवर कोणीतरी गोखले नावाचा बांधकाम व्यवसायिक येतो आणि तिथे मॉल बांधायचा प्रयत्न करतो, तिथल्या जैन समुदायाला हटवण्याचा प्रयत्न होत असेल आणि त्याविरोधात जैन धर्मीय रस्त्यावर उत्तरत असतील तर त्यात काहीही चुकीचं नाही. एक पुणेकर म्हणून मी रवींद्र धंगेकर यांच्या पाठीशी आहे.” अशी स्पष्ट भूमिका शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी घेतली आहे,