'कोणत्याही नेत्यांचा अपमान खपवून घेणार नाही, सत्तेची ही मस्ती उतरवू'; शशिकांत शिंदेंचा इशारा
सांगली : यशवंतराव चव्हाण, वसंतदादा आणि राजारामबापू यांच्यासारख्या नेत्यांनी सुसंकृत राजकारण केलं. मात्र, अचानक संधी मिळून आलेले काही लोकांनी राजकारणाचा स्थर घसरवला आहे, यापुढे आम्ही कोणत्याही नेत्यांचा अपमान खपवून घेणार नाही. सांगलीत सुरुवात झाली आहे. आता महराष्ट्रभर सत्तेची मस्ती उतरवू, असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिला.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी लोकनेते राजारामबापू पाटील, त्यांचे पुत्र आमदार जयंत पाटील यांच्या विरुद्ध केलेल्या आक्षेपार्ह टीकेचा निषेध करण्यासाठी सोमवारी सांगलीत महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा आयोजिला होता, यावेळी ते बोलत होते. मोर्चा कर्मवीर भाऊराव पाटील चौक येथून सुरू झाला. राममंदिर चौक, पंचमुखी मारुती रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, कापडपेठ, भारती विद्यापीठमार्गे स्टेशन चौकपर्यंत काढण्यात आला. त्यानंतर राज्यभरातून आलेल्या नेत्यांनी मोर्चाला मार्गदर्शन केले.
यावेळी खासदार विशाल पाटील, बजरंग सोनवणे, निलेश लंके, अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते पाटील, आमदार विश्वजित कदम, उत्तम जानकर, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, रोहित पवार, रोहित पाटील, लक्ष्मण ढोबळे, माजी मंत्री अजितराव घोरपडे, दिलीप तात्या पाटील, विलासराव जगताप, मिलिंद कांबळे आधी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
हेदेखील वाचा : धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळामध्ये होणार रिएन्ट्री? राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे स्पष्टच बोलले
ते म्हणाले, ‘जयंत पाटील यांच्या मातोश्री आणि राजारामबापू पाटील यांच्याबद्दल ज्या आक्षेपार्ह विधान केला आहे ते महाराष्ट्राला लाजिरवाणे आहे, राज्यात त्यांचे महाविकास आघाडीत झालेले विभाजन, त्यात जाती-धर्माच्या नावाखाली आता विभाजन करून सत्ता टिकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. देवाभाऊ म्हणून एका कार्यक्रमाचे श्रेय घेण्यासाठी सगळीकडे जाहिराती लावल्या, हेच देवाभाऊ जाती-जातीत तेढ निर्माण करणाऱ्याला भविष्यातील नेतृत्व असे कौतुक केलं, जर असेच नेतृत्व ठेवले तर तुमची नाचक्की झालेलीच आहे, ती आणखी वाढणार आहे’, असे त्यांनी म्हटले आहे.
आम्ही राजकीय शत्रू पण ही संस्कृती नाही
खासदार विशाल पाटील म्हणाले, “वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांचे राजकीय संघर्ष होते, ज्या दिवशी राजारामबापू गेले, त्या दिवशी दादांनी आमचा राजकीय संघर्ष संपला असं जाहीर केले होत. आजच्या पिढीत देखील आहेत, आजही जयंत पाटील आमचे राजकीय विरोधक आहेत. आज मी याठिकाणी त्यांच्या आई आणि वडिलांचा अपमान झाला म्हणून आलो आहे, ही आमची राजकीय संस्कृती आहे”.
आया-बहिणींचा अपमान खपवून घेणार नाही
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “यापुढे आम्ही महाराष्ट्रात आया-बहिणींचा अपमान खपवून घेणार नाही, अशी बेताल वक्तव्य करणाऱ्या प्रवृत्ती कोणाचा तरी पाठिंबा असल्याशिवाय इतक्या वाढणार नाहीत, असे पाळलेले लोकच यांना अडचणीत आणणार आहेत”, असेही आव्हाड यावेळी म्हणाले.