
वरळीत ठाकरेंचा 'मशाल' पॅटर्न! ७ पैकी ६ जागा जिंकून आदित्य ठाकरेंनी बालेकिल्ला राखला (Photo Credit- X)
तीन आमदार, दोन माजी महापौर, एक माजी उपमहापौर, बेस्ट समितीचे अध्यक्षपद भूषविलेले दिग्गज माजी नगरसेवक अशी मोठी फौज वरळी विधानसभा मतदारसंघात आहे. मुंबईतील वरळी मतदारसंघ शिवसेनेचा (ठाकरे) बालेकिल्ला मानला जात आहे. शिवसेना मनसे राष्ट्रवादी (शरद पवार) युतीच्या जागा वाटपात वरळीतील सातपैकी सहा प्रभाग शिवसेनेच्या (ठाकरे), तर एक प्रभाग मनसेच्या वाट्याला गेला होता.
शिवसेनेने (ठाकरे) प्रभाग क्रमांक १९३ मधून माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर, १९४ मधून आमदार सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदे, १९५ मधून विजय भणगे, १९६ मधून ज्येष्ठ माजी नगरसेवक आणि बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांच्या पत्नी पद्मजा चेंबूरकर, १९८ मधून अबोली गोपाळ खाडे, तर १९९ मधून माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी दिली. मात्र यापूर्वी अनेकवेळा मोठी पदे भूषविल्यानंतरही यावेळी उमेदवारी देण्यात आल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच कुणाची पत्नी, कुणाच्या भाऊ, तर मोठी पदे भूषविणाऱ्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आल्याने वरळी विधानसभा मतदारसंघात नाराजीचा सूर आळवण्यात येत होता. त्यातूनच सातपैकी चार प्रभागांमध्ये बंडखोरी झाली.
Maharashtra Politics: “खुर्च्या कशा मतदान…”; BMC निकालावर उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला
प्रभाग क्रमांक १९३ मधून रिंगणात उतरलेल्या हेमांगी वरळीकर यांना शाखाप्रमुख सूर्यकांत कोळी यानी आव्हान देत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. तसेच प्रभाग क्रमांक १९४ मध्ये बंडखोरी करीत शिवसैनिक सोनल (शैलजा) पवार यांनी निशिकांत शिंदे यांना आव्हान दिले होते, तर प्रभाग क्रमांक १९६ मधून शाखा संघटक संगीता जगताप यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करीत पद्मजा चेंबूरकर यांच्यासमोर आव्हान उभे केले. मनसेने आपल्या वाट्याला आलेल्या प्रभाग क्रमांक १९७ मधून रचना साळवी यांना उमेदवारी दिली. परंतु, त्या पराभूत झाल्या.
एकेकाळी शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात हिरीरीने सहभागी होणारे माजी नगरसेवक परशुराम देसाई यांनी पत्नी श्रावणी देसाई यांना अपक्ष म्हणून निडणुकीच्या रिंगणात उभे करून बंडखोरी केली, शिवसेनेला (ठाकरे) आणि मनसेला बंडखोरांचे बंड मोडून काढण्यात अपयश आले. मतदारांनी साथ दिल्यामुळे हेमांगी वरळीकर, निशिकांत शिंदे, विजय भणगे, पद्मजा चेंबूरकर आणि अबोली खाडे विजयी झाले. मात्र प्रभाग क्रमांक १९७ मधील बंडखोरीचा फटका मनसेला बसला, मनसेच्या उमेदवार रचना साळवी यांना पराभव पत्करावा लागला, या बंडखोरीचा फायदा शिवसेनेच्या (शिंदे) पथ्यावर पडला. या प्रभागातून शिवसेनेच्या (शिंदे) उमेदवार वनिता दत्ता नरवणकर विजयी झाल्या.