महापालिका निकालांवरून 'सामना'चा प्रहार; एकनाथ शिंदेंवर 'शहा सेना' म्हणून टीका (Photo Credit- X)
‘सामना’च्या अग्रलेखातून महायुतीला लक्ष्य करताना म्हटले आहे की, “जेव्हा राजकारणात विचारधारा आणि ठाम भूमिका शिल्लक राहत नाही, तेव्हा निवडणुका केवळ नावापुरत्या उरतात.” एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला ‘शाह सेना’ असे संबोधत, ही केवळ सत्तेसाठी एकत्र आलेली संधीसाधू शक्ती असल्याची टीका ठाकरे गटाने केली आहे. सत्ता, पैसा आणि निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थांना कठपुतळी बनवून ही ‘कृत्रिम लाट’ निर्माण केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
ठाकरे गटाने निवडणुकीच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. व्यापक भ्रष्टाचार, शाई घोटाळा आणि ईव्हीएम छेडछाडीच्या जोरावर भाजपने हा विजय मिळवल्याचा दावा करण्यात आला आहे. अधिकृत निकाल जाहीर होण्यापूर्वीच भाजपने उत्सव सुरू करणे, हा निवडणूक घोटाळ्याचाच एक भाग असल्याचे ‘सामना’त म्हटले आहे. अनेक मतदार रांगेत असतानाही त्यांना मतदानापासून रोखण्यात आले आणि निवडणूक आयोग ‘अजगरासारखे’ शांत बसून राहिले, असा आरोप करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना ठाकरे गटाने म्हटले की, “या अमृत काळात ना न्यायालयात न्याय मिळतो, ना निवडणुका निष्पक्ष होतात. मतदानाची आकडेवारी २४ तास उलटूनही जाहीर होत नाही, पण भाजपच्या बाजूने एक्झिट पोल मात्र तातडीने दाखवले जातात.” हा निकाल महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी धोक्याची घंटा असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.
बीएमसीने जाहीर केलेल्या अधिकृत निकालानुसार, महायुती सर्वात मोठा गट म्हणून उदयास आली आहे:
भारतीय जनता पक्ष (BJP): ८९ जागा जिंकून प्रथम क्रमांकावर (मतांचा वाटा २१.५८%).
शिवसेना (एकनाथ शिंदे गट): २९ जागा जिंकल्या (मतांचा वाटा ५.००%).
शिवसेना (UBT): ६५ जागा जिंकल्या (मतांचा वाटा १३.१३%).
काँग्रेस (INC): २४ जागांवर विजय.
मनसे (MNS): ६ जागा जिंकून ठाकरे-मनसे युतीला साथ दिली.
ठाकरे-मनसे युतीने जोरदार झुंज दिली असली, तरी सरकारी यंत्रणा आणि निवडणूक आयोगाच्या ‘मनमानी’ कारवायांमुळे त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही, असा दावा ठाकरे गटाने केला आहे.
या निकालांमुळे आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेवरील ठाकरे कुटुंबाचे ३० वर्षांचे वर्चस्व संपुष्टात आले आहे. भाजपने ११८ जागांसह बहुमताचा आकडा पार केला असून, आता मुंबईत भाजपचा महापौर बसण्याचे निश्चित झाले आहे.






