फोटो सौजन्य- istock
गणेश चतुर्थी हा भारतातील सर्वात मोठ्या आणि लोकप्रिय सणांपैकी एक सण आहे. हा सण भक्तीपूर्ण आणि उत्साहात साजरा केला जातो. हा उत्सव दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत साजरा केला जातो. म्हणजे एकूण 10 दिवसांचा हा उत्सव असतो. यावेळी 10 दिवसांमध्ये प्रत्येक घरांमध्ये गणपती बाप्पाची स्थापना केली जाते. भक्त त्यांची मनापासून पूजा करतात. पहिल्या दिवशी गणपतीची स्थापना करण्याची आणि शेवटच्या दिवशी त्याचे विसर्जन करण्याची परंपरा या उत्सवाला खास आहे. मात्र गणेशोत्सव फक्त 10 दिवसांसाठीच का साजरा केला जातो, कमी किंवा जास्त नाही. यामागील धार्मिक किंवा ऐतिहासिक घटना आणि समाजाला जोडणाऱ्या परंपरांशी काय संबंध आहे. गणेशोत्सव 10 दिवस का साजरा केला जातो, काय आहे यामागील कारण जाणून घ्या.
धार्मिक मान्यतेनुसार, गणपतीला विघ्नांचा नाश करणारा आणि उद्घाटनाचा प्रतीक मानले जाते. भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीला याची स्थापना केली जाते आणि मानले जाते की, ते 10 दिवस भक्तांच्या घरी राहतात आणि सुख, समृद्धी आणि सौभाग्य प्रदान करतात. पुराणांमध्ये उल्लेख केल्यानुसार गणपती बाप्पाचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला. म्हणून या दिवसांपासून गणेश चतुर्थीची सुरुवात होते आणि विसर्जन 10 व्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी होते.
इतिहासकारांच्या मते, पेशव्यांच्या काळापासून 10 दिवस गणेश चतुर्थी साजरी करण्याची परंपरा सुरू आहे. त्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी या उत्सवाला जनचळवळ आणि एकतेचे माध्यम बनवले. त्यांनी ते खाजगी पूजेपासून सार्वजनिक उत्सवात रूपांतरित केले जेणेकरून लोक मोठ्या संख्येने एकत्र येऊ शकतील आणि सामाजिक एकता वाढू शकेल. त्यावेळेपासून गणेशोत्सव सार्वजनिकरित्या 10 दिवस साजरा केला जातो.
धार्मिक मान्यतेनुसार, गणपती बाप्पा भक्तांच्या घरी फक्त पाहुणे म्हणून येतात. पाहुण्याला निरोप देणे हे त्याचे स्वागत करण्याइतकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे दहाव्या दिवशी विसर्जन करणे महत्त्वाचे मानले जाते. याचा संबंध निसर्गचक्राशी देखील जोडलेले आहे. कारण मातीपासून बनवलेली मूर्ती पाण्यात विरघळते आणि ती पुन्हा मातीत बदलते त्यामुळे त्याला जीवन आणि मृत्यूच्या चक्राचे प्रतीक मानली जाते.
प्रत्येक कुटुंबामध्ये परंपरा वेगवेगळी असते. बऱ्याच ठिकाणी लोक दीड, तीन, पाच, सात दिवस गणपतीची स्थापना करतात नंतर त्याचे विसर्जन करतात. कारण प्रत्येकाच्या घरामध्ये पूजा करण्याची आणि पाहुण्यांना जास्त काळ पाहुण्यांचे आतिथ्य करण्याची सुविधा नसते. जुन्या श्रद्धेनुसार एक छोटासा उत्सव म्हणून देखील साजरा केला जातो.
गणेश चतुर्थीच्या या 10 दिवसामध्ये संपूर्ण समाजात भक्ती आणि उत्सवाचे वातावरण असते. मकर सजवले जाते, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात आणि लोक एकत्र भक्तिगीते गातात. हा केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक उत्सव देखील आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)