
फोटो सौजन्य- pinterest
कोकण म्हटलं की निसर्गाचे वरदान लाभलेले भूमी साक्षात परशुरामाने वसलेली ही भूमी अशा या कोकणात रत्नागिरीतील प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक असलेले स्थळ म्हणजे वरची आळी येथील “अठरा हाताचा गणपती”! रत्नागिरीतील या मंदिराची ख्याती आता सर्वदूर पोहोचली आहे. हे मंदिर जोशी कुटुंबियांचे खासगी मालकीचे आहे. मात्र असे असले तरी मंदिर दर्शनासाठी सर्वांना खुले असते. दर संकष्टी चतुर्थीला, अंगारकी संकष्टीला, तसेच दर मंगळवारी गणेशभक्त बहुसंख्येने या गणेशाच्या दर्शनाला येत असतात. या मंदिरातील गणपतीच्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तीला अठरा हात आहेत. हे अठरा हात कसे तर येथील वीर विघ्नेशाची मूर्ती महालक्ष्मी व गणपती असे एकत्रित रूप आहे. त्यामुळे महालक्ष्मीचे १६ हात व गणपतीचे चार हात असे मिळून २० हात या मूर्तीला आहेत़; परंतु या दोघांचे दोन हात एकत्रच असल्यामुळे ते दिसत नाहीत. म्हणून हा गणपती अठरा हातांचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे यावरून “अठरा हाताचा गणपती” असे या मंदिरातील मूर्तीचा नामोल्लेख केला जातो. वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे संपूर्ण भारतात अठरा हात असलेली श्री गणेशाची ही एकमेव मूर्ती असावी. तसेच हे एकमेव मंदिर आहे. रुद्रयामल पुराणातील मंत्र दैवत म्हणून हा गणेश ओळखला जातो.
विनायकराव कृष्ण जोशी यांनी १९६७ साली या मंदिराची स्थापना केली. या मंदिराला ५८ वर्षे पूर्ण झाली आहेत. याबाबत आख्यायिका अशी सांगितली जाते की, विनायकराव जोशी हे राजापूरच्या पोस्ट कार्यालयात पोस्टमास्तर म्हणून सेवेत असताना त्यांना इंदूर येथील अच्युतानंद तीर्थस्वामी आपणाहून घरी आले आणि या गणपतीची उपासना करायला सांगितली. काही वर्षांनी विनायकराव जोशी यांची नोकरी सुटल्याने ते महाराजांना भेटायला गेले. तेव्हा ते म्हणाले की, आता या गणपतीची पूर्ण उपासना कर, संपूर्ण भारतभर तुझी किर्ती होईल. अच्युतानंद तीर्थस्वामींचे भारतभर १५०० हून अधिक शिष्य होते, त्यापैकी विनायकरावांनाच त्यांनी मनोभावे श्रीगणेशाची उपासना करायला सांगितली. तसेच इतरांना देवीची उपासना दिली. त्यानंतर विनायकरावानी गणपतीपुळे येथे जाऊन २१ दिवसांची कठोर उपासना केली. तेव्हा देवाने त्यांना साक्षात द्रष्टांत देऊन मंदिर बांधण्याचा आदेश दिला. त्यानंतर विनायकरावानी हे मंदिर बांधल्याची आख्यायिका आहे.
मंदिर अत्यंत साध्या स्वरूपाचे आहे. गाभारा छोटेखानी आहे त्यामध्ये अठरा हाताच्या गणपतीची पूर्वाभूमुखी प्रसन्न मूर्ती आहे. या मंदिराच्या स्थापनेची प्रसन्नता भक्तांना ऊर्जा देऊन जाते. या मूर्तीचे वेगळेपण म्हणजे या श्री गणेशाला १८ हात आहेत. त्याच्या प्रत्येक हातात १८ प्रकारची आयुधे आहेत. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते पंचमी असा देवाचा वार्षिक उत्सव असतो. त्यावेळेला या मंदिरात सर्व धार्मिक विधी केले जातात. मार्गशीर्ष शुद्ध चतुर्थीला दुपारी १२.३९ वाजता जन्मोत्सव साजरा केला जातो. यावेळी देवाला सहस्त्र मोदक, सहस्त्र दुर्वा, सहस्त्र शमीपत्रे, सहस्त्र तीळ, सहस्त्र तांदूळ वाहिले जातात. पंचमीच्या दिवशी तो मोदक प्रसाद म्हणून गणेशभक्तांना वाटण्यात येतो. हा गणेश भक्तांच्या मनातील मनोकामना पूर्ण करतो अशी गणेशभक्तांची श्रद्धा आहे. या मंदिरात दर मंगळवारी, संकष्टी चतुर्थी, अंगारकी संकष्टीला अठरा हाताच्या गणपतीचे भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. या मंदिराची सर्व व्यवस्था नाना जोशी आणि त्यांचे बंधू, कुटुंबीय पाहतात.
मुंबई – पुण्यावरून ट्रेनने रत्नागिरीला जायचे. तेथून रिक्षाने किंवा खासगी वाहनाने मंदिरात जाता येते. तसेच मुंबई व पुण्यावरून बसनेही जाता येते. रत्नागिरी एसटी स्टँडवरून अगदी जवळपास हे मंदिर आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: अठरा हातांचा गणपती ही भगवान गणेशाची एक दुर्मिळ आणि विलक्षण मूर्ती आहे, ज्यामध्ये गणपती बाप्पांना 18 हात दर्शवलेले आहेत. ही मूर्ती शक्ती, संरक्षण आणि ज्ञानाचे प्रतीक मानली जाते.
Ans: अठरा हातांचा गणपती महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात स्थित आहे. ही मूर्ती स्थानिक भक्तांमध्ये विशेष श्रद्धेचे केंद्र आहे.
Ans: गणपतीचे 18 हात अष्टदिशा, विविध शक्ती, तसेच भक्तांचे सर्व प्रकारचे संकट दूर करण्याची क्षमता दर्शवतात.