
महाराष्ट्रातील होळी
महाराष्ट्रात होळी म्हणजे हुताशनी पौर्णिमा. या दिवशी होलिका दहन केलं जातं आणि पुरणपोळीचा नैवेद्य होळीला दाखवला जातो. कोकणभागात याला शिमगा असं देखील म्हणतात. यावेळी दशावतार ही लोककला सादर केली जाते. होलिका दहन म्हणजे जे काही वाईट आहे जे होळीच्या अग्नीत जळून जावं आणि सारं काही मंगल व्हावं अशी श्रद्धा महाराष्ट्रात पाहायला मिळते. होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी असते ती धुळवड. महाराष्ट्रातल्या काही खेडेगावात धुळवडीला मटणाचा बेत केला जातो.
मथुरेतील होळी
हिंदू धर्मात मथुरेला विशेष महत्व आहे. याचं कारण म्हणजे मथुरा ही श्रीकृष्णाची जन्मभूमी. अशी दंतकथा सांगितली जाते की, श्रीकृष्ण गोपिकांसह धुळवड आनंदाने साजरा करायचा. खास धुळवडीच्य़ा दिवशी उत्तरप्रदेशमधील सर्व मंदिरं सजवली जातात. इथली रंगपंचमी फक्त रंगांनी साजरी होत नाही. श्रीकृष्णाचं मंदिर म्हणजे बाके बिहारी या मंदिरात तर फुलांची उधळण केली जाते. बांके बिहारी मंदिरातीलआगळा वेगळा रंगपंचमीचा थाट पाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक हजेरी लावतात.
पंजाबमधील होळी
पंजाबची ओळख म्हणजे तेथील शेतीव्यवसाय, तिकडची असलेली लोककला. मात्र या व्यक्तिरिक्त पंजाबचं वेगळेपण सांगणारा सण म्हणजे मोहल्ला. हिंदू धर्मातील शीख बांधव होला मोहल्ला हा सण साजरा करतात. शीख बांधवांचा हा सण काहीसा होळीप्रमाणेच असतो. तीन दिवस साजरा होणाऱ्या होला मोहल्लामध्ये घोडेस्वारी केली जाते. त्याचबरोबर भांगडा नृत्य आणि संगिताबरोबरच रंग सुद्धा खेळले जातात. भारताच्या सीमाभागावर असलेल्या या राज्यातील अनेक वीर जवानांनी देशासाठी वीर मरण पत्करलं. त्यामुळे या सणाच्या निमित्ताने सैनिकांच्या शौर्यगाथा सांगण्याची देखील परंपरा आहे.
राजस्थान
राजपूत म्हणजे राजेशाही हिंदू घराण्यांचा वारसा लाभलेलं राज्य म्हणजे राजस्थान. येथील अजमेर, उदयपुर, पुष्कर, बीकानेर आणि जयपुर या शहरांत होणारा होळीचा उत्सव पाहणं म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणी असते. तुन्ही जर इतिहासप्रेमी असाल तर एकदातरी राजस्थानमधील होळी अनुभवायला पाहिजेच.
केरळ
महाराष्ट्र आणि उत्तरेच्या राज्यांप्रमाणेच दाक्षिणात्य राज्यात देखील होळी साजरी केली जाते. मात्र या ठिकाणी असेलेली प्रथा परंपरा पूर्णत: वेगळी आहे. होळी म्हणजे वसंत ऋतूची चाहूल असते. याकाळात शेतातील धान्य पिकलेलं असतं त्यामुळे निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यालाठी केरळमधील येथील शेतकरी यज्ञात धान्य अर्पण केलं जातं. अशा पद्धतीने केरळमध्ये होळी साजरी केली जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)