
Navratri 2026: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
ओटी म्हणजे बेंबीच्या खाली असलेला पोटाचा भाग. जिथे स्त्रीचे गर्भाशय असते. जशी जमिनीत नवीन धान्य उगवण्याची ताकद असते, तशीच स्त्रीच्या ओटीमध्ये नवीन जीवाला जन्म देण्याची ताकद असते. म्हणूनच फक्त लग्न झालेल्या बायकांचीच ओटी भरतात, विधवा बायकांची नाही भरत.लग्नात सुद्धा हा विधी असतो. त्याला फळ भरणे किंवा फलशोभन असेही म्हणतात. खेड्यापाड्यात अजूनही याला फळ भरणेच म्हणतात. मुलगी सासरी जाताना तिची ओटी भरली जाते, जेणेकरून तिचे सासर फळा-फुलांनी भरून जावो.
ओटी भरताना उगाच काहीही टाकत नाहीत. प्रत्येक गोष्टीला एक अर्थ आहे. त्यामध्ये तांदूळ, खोबरे, नारळ,सुपारी, हळकुंड, पाच प्रकारची फळे आणि हळद-कुंकू असते.
खूप जुन्या काळापासून चालत आली आहे. आज आपण कितीही मॉडर्न झालो तरी लग्न किंवा बाळंतपणासारख्या वेळी ही पद्धत आवर्जून केली जाते. यावरूनच कळते की याला किती महत्व आहे.
आपण बायकांची ओटी भरतो तशीच देवीची पण ओटी भरतो. खास करून नवरात्रीच्या अष्टमीला किंवा एखादे चांगले काम झाले की देवीची ओटी भरली जाते. कारण आपल्याला जे सौभाग्य मिळाले आहे ते त्या देवीमुळेच मिळाले आहे, म्हणून तिचे आभार मानण्यासाठी देवीची ओटी भरली जाते.
देवीला कधीच सहावारी साडी देत नाहीत, तिला नेहमी नऊवारी साडी आणि खण देतात. याचे कारण असे की नऊवारी ही देवीच्या नऊ रूपांचे प्रतीक आहे. आणि जो त्रिकोणी खण असतो तो ब्रह्मा, विष्णू, महेश या तीन देवांच्या शक्तीचे प्रतीक मानला जातो.
साडी शक्यतो रेशमाची असावी असे म्हणतात. कारण देवीच्या मूर्तीतून निघणारी चांगली एनर्जी रेशमात जास्त टिकते. त्या साडीवर खण ठेवायचा आणि त्यावर नारळ, तांदूळ वगैरे ओटीचे सामान ठेवायचे. नारळाची शेंडी नेहमी देवीच्या दिशेला असावी. आणि मग देवीला सांगायचे की “आई, ही ओटी स्वीकार कर आणि तुझी कृपा आमच्यावर अशीच राहू दे”.तर अशी ही ओटी भरण्याची परंपरा आहे. हा फक्त एक रिवाज नाहीये, तर हा स्त्रीच्या सर्जनशीलतेचा, तिच्या आईपणाचा केलेला आदर आहे.