
वडिलांची शेवटची इच्छा अन् एका ऑडिशनने बदललं कृतीचे नशीब! भन्सालींची पहिली संधी हुकली पण....
यावेळी कृती महेश हीने सांगितले की, तिने लंडनमध्ये जाऊन पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले होते. तिच्याकडे उच्च शिक्षणाची पदवी होती आणि इन्व्हेस्टमेंट क्षेत्रात करिअर करण्याचा तिचा विचार होता. मात्र, वडिलांची प्रकृती बिघडल्यामुळे तिला भारतात परतावे लागले. भारतात आल्यानंतर ती वडिलांसोबत वेळ घालवत होती. याच काळात ‘डान्स इंडिया डान्स’चा पहिला सीझन सुरू होता. कृती आणि तिचे वडील हा कार्यक्रम एकत्र पाहायचे. कार्यक्रम पाहताना वडिलांनी कृतीला नृत्यक्षेत्रात संधी आजमावण्याचा सल्ला दिला. मात्र, एवढे शिक्षण घेतल्यानंतर अचानक नृत्यक्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेणे तिला योग्य वाटत नव्हते. लहानपणापासून नृत्याची आवड असली तरी त्याकडे व्यावसायिक करिअर म्हणून तिने कधी पाहिले नव्हते. तिच्या कुटुंबातही या क्षेत्रातील कोणी नसल्यामुळे पुढे नेमके काय करायचे, याची तिला कल्पना नव्हती.
Navratri 2026: नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांची केली जाते पूजा, जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे
कृतीच्या आयुष्यातील सर्वांत भावनिक आठवण म्हणजे तिच्या वडिलांची शेवटची इच्छा. वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने ‘डान्स इंडिया डान्स’च्या दुसऱ्या सीझनची ऑडिशन देण्याचा निर्णय घेतला. ऑडिशनमध्ये निवड झाली नाही तरी आपल्याकडे शिक्षण आहे आणि दुसरी नोकरी करता येईल, असा विचार तिने केला. मात्र, पहिली, दुसरी आणि तिसरी अशा विविध फेऱ्या पार करत तिची ‘डान्स इंडिया डान्स’च्या दुसऱ्या सीझनमध्ये निवड झाली. यानंतर तिच्या आयुष्याला अनपेक्षित वळण मिळाले.
‘डान्स इंडिया डान्स’मध्ये निवड झाल्यानंतर कृती प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक टेरेन्स लुईस यांच्या ‘टेरेन्स की टोली’ या टीममध्ये सहभागी झाली.
या कार्यक्रमात तिला अनेक प्रतिभावान नर्तकांसोबत काम करण्याची संधी मिळाली. या अनुभवामुळे नृत्याविषयीचा तिचा आत्मविश्वास वाढला.
कृतीने सांगितले की, तिने लहानपणापासून शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेतले होते. त्यासोबत पाश्चात्त्य नृत्यशैली आणि काही प्रमाणात जिम्नॅस्टिक्सचाही सराव केला होता. रिॲलिटी शोमधील अनुभवांनंतर तिने पुढील एक-दोन वर्षे नृत्याला पूर्ण वेळ देण्याचा निर्णय घेतला. छंद म्हणून नृत्य करण्याऐवजी संपूर्ण मेहनत, लक्ष आणि समर्पण या क्षेत्रासाठी देण्याचे तिने ठरवले.
नृत्यक्षेत्रात काम करत असताना कृतीला प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा यांच्या टीममधून फोन आला. एका प्रोजेक्टसाठी काम करण्याची संधी तिला देण्यात आली. यापूर्वी असे काम केले नसतानाही तिने ती संधी स्वीकारली. कृतीने सांगितले की, त्या टप्प्यावर तिने स्वतःला नृत्यक्षेत्रासाठी पूर्णपणे समर्पित केले होते. नवीन गोष्टी शिकायच्या आणि मिळालेल्या प्रत्येक संधीचा उपयोग करायचा, असा तिचा दृष्टिकोन होता.
रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटातील ‘बलम पिचकारी’ हे गाणे कृतीच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरला. या गाण्याच्या चित्रीकरणाचा अनुभव सांगताना कृती म्हणाली की, प्रेक्षक म्हणून आपण एखादे गाणे पाहतो आणि ते चांगले किंवा वाईट असल्याची प्रतिक्रिया देतो. मात्र, प्रत्यक्षात एक गाणे तयार करण्यामागे किती मेहनत असते, हे सेटवर गेल्यानंतर समजले. या गाण्याच्या सेटवर मोठ्या संख्येने नर्तक, सहाय्यक दिग्दर्शक, सहाय्यक नृत्यदिग्दर्शक, वेशभूषाकार आणि तांत्रिक कर्मचारी काम करत होते. अवघ्या तीन ते चार मिनिटांच्या गाण्यासाठी अनेक लोकांची मेहनत, वेळ आणि प्रतिभा खर्च होते, हे पाहून ती प्रभावित झाली. याच अनुभवामुळे चित्रपटसृष्टीतील नृत्यदिग्दर्शनाची तिला अधिक आवड निर्माण झाली.
त्यानंतर कृतीला ‘डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स’ या कार्यक्रमात एका टीमची कॅप्टन म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
या कार्यक्रमात तिला लहान मुलांसोबत काम करता आले. अवघ्या पाच-सहा वर्षांच्या मुलांमध्ये असलेली नृत्याची प्रतिभा पाहून ती प्रभावित झाली. मात्र, या कार्यक्रमासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागत होती. काही वेळा सलग १६ तास काम करावे लागत असल्याचे तिने सांगितले.
इतक्या मेहनतीनंतरही लहान मुलांसोबत काम करण्याचा अनुभव अत्यंत सुंदर आणि समाधानकारक असल्याचे कृतीने सांगितले.
कृतीच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाच्या टप्पा म्हणजे एक म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या कार्यालयातून आलेला फोन.
एका कार्यक्रमात काम करत असताना तिला भन्साळी यांच्या कार्यालयातून भेटीसाठी बोलावण्यात आले. हा फोन आल्यानंतर आपल्याला आयुष्यातील मोठे यश मिळाल्यासारखे वाटल्याचे कृतीने सांगितले. भन्साळी यांनी तिचे काम पाहिले होते आणि ते त्यांना आवडले होते. त्यांनी एका नवीन प्रोजक्टसाठी तिला नृत्यदिग्दर्शन करण्याची संधी देण्याबाबत चर्चा केली. मात्र, त्यावेळी सुरू असलेल्या टेलिव्हिजन कार्यक्रमांच्या वेळापत्रकामुळे तिला त्या प्रकल्पात काम करता आले नाही.
संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याची संधी हुकल्याने कृती प्रचंड निराश झाली होती. इतकी मोठी संधी पुन्हा मिळेल की नाही, याची तिला चिंता वाटत होती. या घटनेनंतर तीन ते चार महिने अक्षरशः रडलो, असे तिने सांगितले. मात्र, त्यानंतरही तिने काम करणे थांबवले नाही. चित्रपटांमध्ये सहाय्यक म्हणून काम करत तिने आपला प्रवास सुरू ठेवला.
काही काळानंतर कृतीला ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाच्या कामात सहभागी होण्याची संधी मिळाली. चित्रपटाच्या रिहर्सलदरम्यान संजय लीला भन्साळी येणार असल्याचे तिला समजले. पहिल्या भेटीला जवळपास दोन वर्षे उलटली होती. त्यामुळे भन्साळी आपल्याला ओळखतील का, असा प्रश्न तिच्या मनात होता. मात्र, भन्साळी यांनी तिला पाहताच ओळखले. दोन वर्षांनंतरही त्यांना आपली आठवण असल्याचे पाहून कृती आश्चर्यचकित झाली. भन्साळी यांची स्मरणशक्ती आणि कामातील बारकाव्यांकडे लक्ष देण्याची क्षमता विलक्षण असल्याचे तिने सांगितले.
‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातील ‘पिंगा’ आणि ‘दीवानी मस्तानी’ या गाण्यांवरील कामाचा अनुभव कृतीसाठी अविस्मरणीय ठरला.
‘दीवानी मस्तानी’ या गाण्याच्या नृत्यदिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा आनंदही तिने व्यक्त केला. या कामाचे श्रेय देताना संजय लीला भन्साळी यांनी तिच्या योगदानाचे कौतुक केल्याची आठवण तिने सांगितली. भन्साळी यांच्यासारख्या मोठ्या दिग्दर्शकाने आपल्या कामाची दखल घेणे आणि सर्वांसमोर कौतुक करणे, हे त्यांचे मोठेपण असल्याचे कृती म्हणाली.
‘बाजीराव मस्तानी’नंतर काही काळातच कृतीला पुन्हा संजय लीला भन्साळी यांच्या कार्यालयातून फोन आला. नवीन चित्रपट आणि त्यातील नृत्यदिग्दर्शनाच्या कामाबाबत तिच्याशी चर्चा करण्यात आली. या वेळी पारंपरिक लोकनृत्य आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या नृत्यरचनांवर काम करण्याचा अनुभव तिने सांगितला. राजस्थानी घूमर नृत्याच्या सादरीकरणासाठी घेतलेल्या मेहनतीचाही तिने उल्लेख केला. या अनुभवातून नृत्यदिग्दर्शन म्हणजे केवळ स्टेप्स बसवणे नसून त्या नृत्यशैलीमागील संस्कृती, परंपरा आणि इतिहास समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
पॉडकास्टमध्ये कृतीने स्वतःच्या ‘काली’ या कंपनीच्या नावामागील विचारही सांगितला. काली देवीचे रूप अनेकदा रौद्र स्वरूपात पाहिले जाते. मात्र, तिच्याविषयी अधिक वाचन केल्यानंतर या रूपामागील सृजनशक्ती आणि व्यापक अर्थ समजल्याचे कृतीने सांगितले. या विचारातूनच तिने आपल्या कंपनीसाठी ‘काली’ हे नाव निवडल्याचे स्पष्ट केले.
नवरात्रोत्सवानिमित्त महिलांना संदेश देताना कृती महेशने स्वतःच्या आनंदाला महत्त्व देण्याचे आवाहन केले. आयुष्यात सतत तडजोड करत राहू नका. स्वतःला कोणत्या गोष्टीत आनंद मिळतो, हे ओळखा आणि त्यासाठी प्रयत्न करा, असे तिने सांगितले. “तुम्ही स्वतः आनंदी असाल, तरच दुसऱ्यांनाही आनंदी ठेवू शकता. त्यामुळे ज्या गोष्टीत तुम्हाला आनंद मिळतो, ती गोष्ट नक्की करा,” असा संदेश कृतीने दिला.
वडिलांच्या इच्छेखातर नृत्यक्षेत्रात पहिले पाऊल टाकणाऱ्या कृतीने मेहनत, जिद्द आणि स्वतःच्या कलेवरील विश्वासाच्या जोरावर राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मजल मारली. तिचा हा प्रवास नव्या पिढीतील तरुणींसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.