फोटो सौजन्य- pinterest
स्वामी महाराज प्रकट दिन आज सोमवार, 31 मार्च रोजी सर्वत्र साजरा केला जाणार आहे. चैत्र द्वितीय तिथीला स्वामी समर्थ महाराजाचा प्रकट दिन मानला जातो. दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे स्वामी समर्थ मानले जातात. प्रकट दिनाच्या निमित्ताने अक्कलकोटासह ज्या ठिकाणी स्वामींचे मठ आहेत, त्या ठिकाणी विशेष पूजन विधी, पूजन विधी, ओम आवाहन, उपासना, नामस्मरण इत्यादींचे आयोजन केले जाते. स्वामी भक्तही स्वामी नामात तल्लीन होऊन जातात. या दिवशी शक्य तेवढी स्वामींची सेवा करण्याकडे भाविकांचा कल असतो. नियमितपणे स्वामीची सेवा करणारे लाखो भक्त असतात. मात्र, प्रकट दिनाचे औचित्य साधून विशेषत्वाने स्वामींची सेवा केली जाते. स्वामीची घरच्या घरी सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची जाणून घ्या
सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्थान झाल्यानंतर ज्या ठिकाणी स्वामीची पूजा करणार आहात ते ठिकाण स्वच्छ करावे. त्यानंतर चौरंगावर स्वामीची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापन करावी. त्यानंतर पूजनाचा संकल्प करावा. स्वामींचे आवाहन करावे. पंचामृताने अभिषेक करुन स्वामींना नैवेद्य दाखवावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पानं, फुल, फळ स्वामींना अर्पण करावी. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून स्वामींची आरती करावी. यानंतर नमस्कार करुन सर्वांना प्रसाद वाटावा. शक्य झाल्यास स्वामींचे स्तोत्र, श्लोक, मंत्र यांचा जप करावा. आपल्या कुळाचार, कुळधर्म, परंपरा यानुसार पूजन करावे. विशेष म्हणजे स्वामींना आवडतील अशी फुले अर्पण करावी. स्वामींचटे आवडते पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करावेत. पूजा झाल्यानंतर पिवळ्या रंगाची मिठाई, वस्त्र इत्यादी गोष्टी स्वामींना अर्पण करावे. 108 वेळा स्वामी मंत्रांचा जप करावा. 108 वेळा शक्य नसल्यास जितके जमेल तितक्या वेळा जप करावा.
स्वामींच्या लीला अगाध आहे. स्वामींचा थांग कोणालाही लागू शकत नाही. स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही कधीही कोणी सांगू शकत नाही. मात्र, जेव्हा कृपा होते तेव्हा शुभाशिर्वाद मिळतात. जेव्हा स्वामींचे अनुभव येतात तेव्हा धन्य झाल्यासारखे वाटते म्हणूनच स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृड विश्वास ठेवा. स्वामी तुमचे नक्कीच शुभ करतील, अशी अढळ श्रद्धा कायम मनात ठेवा. महाराजांप्रति केवळ नम्र, शरणागत आणि समर्पण भाव ठेवा. स्वामींवरील श्रद्धा आणि निष्ठा कधीही कमी होऊ देऊ नका. स्वामींवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण आणि स्वामींची सेवा करत राहा.
कथेनुसार, असे मानले जाते की पंजाब प्रांतातील हस्तिनापूरपासून २४ किमी अंतरावर असलेल्या छेली खेडा नावाच्या गावात एका वटवृक्षाजवळ श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले होते. अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात 1856 मध्ये त्यांचे दर्शन झाले. तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया तिथीचा. त्यानुसार या वर्षी 31 मार्चला सोमवारी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन साजरा केला जाणार आहे. श्रीपाद वल्लभ आणि नृसिंह सरस्वती यांच्यानंतर स्वामी समर्थ महाराज हे भगवान श्री दत्तात्रेयांचा तिसरा अवतार मानले जातात. अशी मान्यता आहे की, अक्कलकोटमध्ये प्रकट होण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ हे इकडे-तिकडे फिरत राहिले आणि मंगळवेढा येथे आले होते. याठिकाणी ते चांगलेच लोकप्रिय झाले. येथून ते सोलापूरमार्गे अक्कलकोटला आले.
श्री स्वामी समर्थ महाराज पहिल्यांदा अक्कलकोटला आले तेव्हा ते खंडोबा मंदिरात स्थानपन्न झाले. या ठिकाणच्या मुक्कामात त्यांनी अनेक चमत्कार केले. विशेष म्हणजे त्यांनी कोणातही कधीच फरक केला नाही. आपल्या मुक्कामात त्यांनी सर्वांना सांगितले की, ते यजुर्वेदी ब्राह्मण आहे, त्यांचे गोत्र कश्यप आहे आणि राशी चिन्ह मीन आहे. त्यांनी आपले शिष्य श्री बालप्पा आणि श्री चोलप्पा यांना आशीर्वाद दिला. त्यानंतर तेथून स्वामी समर्थांनी संपूर्ण देशाचा दौरा केला. या दौऱ्यात ते सर्वत्र वेगवेगळ्या नावांनी ओळखले गेले.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)