फोटो सौजन्य- pinterest
उद्या म्हणजेच 31 मार्च रोजी श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन साजरा केला जाणार आहे. स्वामींचे भक्त मोठ्या भक्तिभावाने या दिवशी स्वामींच्या चरणी लीन होऊन त्यांची सेवा करतात. स्वामी समर्थांच्या मठामध्ये देखील प्रकट दिनानिमित्त महिनाभर आधीपासूनच वेगवेगळ्या कार्यक्रमांना सुरुवात होत असते. पण प्रत्येक भक्ताच्या मनात प्रेम आणि आदराचं स्थान मिळवणारे श्री स्वामी समर्थ महाराज कधी प्रकट झाले? कुठून आले? याबद्दल सगळ्यांना उत्सुकता असते. आपण ज्यांची मनोभावे भक्ती करतो ते आपले स्वामी कसे प्रकट झाले याबद्दल जाणून घेण्याची इच्छा प्रत्येकाला असते. जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाची कथा
यंदा उद्या ३१ मार्च म्हणजेच सोमवारी स्वामी समर्थ प्रकट दिन म्हणजेच स्वामी समर्थ यांची जयंती मोठ्या उत्सवात सर्वत्र साजरी केली जाणार आहे. इ.स. १८५६ च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा त्यांनी अक्कलकोट नगरीत प्रवेश केला तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला होता तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया, शके १७७८, दि. ०६/०४/१८५६ दिवस रविवार होता. स्वामींनी महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केले. श्रीपाद वल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार असल्याचे मानले जाते. हिंदू पंचागानुसार, प्रत्येक वाराला विशेष असे महत्त्व आहे. गुरुवार हा दिवस स्वामी समर्थांना अर्पण केला आहे. असे म्हटले जाते की, या दिवशी स्वामी समर्थांचे व्रत आणि पूजा केल्याने अनेक दु:ख दूर होतात. ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.’ हे त्यांचे लोकप्रिय शब्द भक्तांना नेहमी जगण्यास बळ देतात. भक्तांच्या मते, स्वामींचे नाव घेतल्याने नवीन ऊर्जा प्राप्त होते तसेच नैराश्य दूर होते.
श्री स्वामी समर्थांच्या प्रकट होण्याची माहिती सांगणारे कोणतेही अधिकृत दस्तऐवज नाही. कथेनुसार, असे मानले जाते की पंजाब प्रांतातील हस्तिनापूरपासून २४ किमी अंतरावर असलेल्या छेली खेडा नावाच्या गावात एका वटवृक्षाजवळ श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले होते. अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात 1856 मध्ये त्यांचे दर्शन झाले. तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया तिथीचा. त्यानुसार या वर्षी 31 मार्चला सोमवारी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन साजरा केला जाणार आहे. श्रीपाद वल्लभ आणि नृसिंह सरस्वती यांच्यानंतर स्वामी समर्थ महाराज हे भगवान श्री दत्तात्रेयांचा तिसरा अवतार मानले जातात. अशी मान्यता आहे की, अक्कलकोटमध्ये प्रकट होण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ हे इकडे-तिकडे फिरत राहिले आणि मंगळवेढा येथे आले होते. याठिकाणी ते चांगलेच लोकप्रिय झाले. येथून ते सोलापूरमार्गे अक्कलकोटला आले.
श्री स्वामी समर्थ हे पूर्णब्रह्माच्या रूपातील श्री दत्त महाराजांचे तिसरे अवतार आहेत. श्री स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना कायम हव्या त्या स्वरूपात दर्शन दिलं आहे. ज्या रूपात ते आपल्या भक्तांना पूर्वी दिसले त्याच रूपात दर्शन देत असत. काही भक्तांनी त्यांना श्री विठू माऊली, काहींनी श्री भगवान विष्णू तर काहींना भगवती म्हणून पाहिले आणि अनुभवले. प्रत्येक अडचणीत, संकटात श्री स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे राहतात, असे अनुभव स्वामींच्या भक्तांकडून अनेक वेळा सांगितले गेले आहेत. ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे..’ हे स्वामी समर्थांचं वाक्य आजही त्यांच्या भक्तांना प्रत्येक संकटात आधार देतं.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)