
वेळ अमावस्या, शेतशिवारातला मोठा उत्सव; नेमका कुठे आणि कसा होतो सण साजरा?
लातूर/ ज्ञानेश्वर मोरे : आज (19 डिसेंबर 2025) वेळ अमावास्या आहे. याला येळवस अमावास्या असंही म्हणतात. हा सण मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. शेतातील काळ्या आईचं ऋण फेडण्यासाठी आज तिची मनोभावे पूजा केली जाते. गावातील सर्वजण आज शेतात वनभोजनाचा आनंद लुटतात. हा सण लातूर आणि उस्मानाबाद, सोलापूर आणि बीड जिल्ह्याच्या काही भागात साजरा केला जातो. शेतातली ती लहानशी झोपडी, त्यात बनवलेलं स्वादिष्ट जेवण आणि सर्वांनी एकत्र केलेलं वनभोजन, पूर्वी हा आनंद काही निराळाच असायचा. परंतु आता मात्र पूर्ण कुटुंब शेतात एकत्र जमणं अवघडच. तरीही आपल्या शेतकरी बांधवांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी काळ्या आईचे ऋण फेडणारे पारंपरिक सण-उत्सव आजही जपले आहेत. ‘वेळ अमावस्या’ उत्सवही त्यापैकीच एक.
आज मराठवाड्यातील काही भागांत शेत शिवारात नागरिकांची गर्दी आणि बच्चे कंपनीचा किलबिलाट राहणार आहे. या दिवशी शेतात कडब्याचे कोप करून शेताततल्या लक्ष्मीची पुजा मांडली जाते. शेतात खरीप व रब्बी या दोन हंगामात मिळून वेळ अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीची पुजा केली जाते. मातीची लक्ष्मीची मुर्ती तयार केली जाते. कडब्याच्या कोपात लक्ष्मीची प्रतिष्ठापना करतात. पुजा केली जाते. शेतातील पांडवांना नवा रंग दिला जातो. रब्बी हंगामातील गहू, हरबरा, ज्वारी, करडई, सुर्यफुल आदी पिकात चर शिंपून रब्बीचा हंगाम चांगला होऊ दे, अशी प्रार्थना केली जाते.
वेळ अमावस्या म्हणजे काय?
पेरणीनंतरची सातवी अमावस्या म्हणजे वेळ अमावस्या. जूनमध्ये पेरणी होते. सातवी अमावस्या डिसेबंर अखेरीस किंवा जानेवारीच्या पंधरवाड्यात येते. खरीपातील केवळ तुरीची रास होणे बाकी असते. तुरही ऐन बहरात असते. रब्बी हंगामातील पेरणी होऊन सपुंर्ण शेती हिरवीगार झालेली असते. ऊनाची तीव्रता देखील नसते. वेळ अमावस्या साजरी करण्याची प्रथा कधी सुरू झाली असावी, याबाबतची निश्चित नोंद उपलब्ध नाही. वेळ अमावस्येच्या काळात लातूरसारख्या शहरी भागात तर कर्फ्यूसारखे वातावरण रस्त्यावर दिसते.
वेळ अमावस्यातील पदार्थ
ज्वारी, बाजरीचे उंडे, सर्व भाज्यांपासून तयार केली जाणारी भाजी, अंबिल या पदार्थांना वेळ अमावस्येच्या दिवशी जेवणात पहिल्या दर्जाचा मान असतो, या व्यतिरिक्त जो तो आपल्या कुवतीप्रमाणे अन्य पदार्थ तयार करतो. आंबील, गव्हाची खीर, भज्जी, भाकरी, कुटलेली शेंगदाण्याची चटणी, हिरव्या मिरचीचा ठेचा नंतर बोरं, पेरू, हरबरे असे असंख्य पदार्थ असतात. या साठी घरातील महिला दोन दिवसापासून तयारी करतात.
हेदेखील वाचा : Margashirsh Amavasya: वर्षअखेरीस अमावस्येचा शुभ योग; सूर्य–मंगळ कृपेने या राशींच्या लोकांना होणार धनलाभ