bhavani devi pune information in marathi
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागांमध्ये लाकडी वाड्यांमध्ये देवीदेवतांची अनेक मंदिरं आहेत. वाड्याच्या मध्ये टुमदार कौलारु मंदिरं आणि आजूबाजूला छोटीखानी घरं अशी या वाड्याची रचना असते. अनेक दशकं ही मंदिरं शहरातील सांस्कृतिक परंपरा जपून आहेत. त्यापैकीच एक देवीचे मंदिर म्हणजे भवानी मातेचे मंदिर. ज्या भागाला याच देवीच्या नावाने ओळखले जाते, अशा भवानी पेठेमध्ये हे भवानी मातेचे मंदिर आहे. शहरातील मुख्य आणि ऐतिहासिक अशा देवींच्या मंदिरांपैकी एक हे भवानी मातेचे मंदिर आहे. नवरात्रीमध्ये या भवानी मातेच्या दर्शनासाठी पुण्यासह आसपासच्या शहरातील भाविक देखील येत असतात. नवरात्रीमध्ये मोठा उत्सव भवानी माता मंदिरामध्ये असतो.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेली तुळजापूरची आई भवानी महाराष्ट्राची कुलदेवी आहे. आई भवानी ही दुर्गा देवीचे स्वरुप मानली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांची देखील आई तुळजाभवानी देवीवर निस्सिम भक्ती होती. पण प्रत्येक भाविकाला तुळजापूरला दर्शनासाठी जाणे शक्य होत नाही. त्यांना पुण्यामध्ये देखील आई भवानीचे दर्शन घेता येते. भवानी पेठेतील भवानी देवीचे मंदिर अतिशय लोकप्रिय आहे. वाडा संस्कृतीच्या पाऊलखुणा या मंदिराच्या वाड्यामध्ये दिसून येतात. सध्या या मंदिराचा कारभार मेढेकर कुटुंब पाहते आणि देवीची सेवा करते.
भल्या मोठ्या लाकडी दरवाज्यातून मंदिराच्या आवारामध्ये प्रवेश करता येतो. त्यानंतर वाड्याच्या मध्यभागी कौलारु असे देवीचे मंदिर आहे. या मंदिराची बांधणी लाकडी आहे. मंदिराच्या आवारामध्ये दीपमाळ, यज्ञकुंड आणि देवीचे वाहन असलेला सिंहाची मूर्ती आहे. त्यानंतर मंदिराचा सभागृह आणि गर्भगृह आहे. सभागृहामध्ये लाकडी छताला विविध जुन्या काळातील दिवे लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर अनेक देवीदेवतांची चित्रं देखील लावण्यात आली आहेत. यामुळे सभागृहामध्ये अगदी प्रसन्न वाटते. मंदिराच्या गर्भगृहामध्ये देवीची काळ्या पाषाणातील नेत्रदीपक अशी मूर्ती आहे.
त्यानंतर या मूर्तीची स्थापना करण्यात आली. 1760 साली या भवानी मातेच्या मंदिराची स्थापना करण्यात आली. सुतवणी घराण्याने या मंदिराची स्थापना केली. पुणे शहर पूर्वी मर्यादीत आणि लहान होतं. त्यामुळे हे मंदिर अगदी शहराच्या वेशीवर होतं. आता मात्र ते शहराच्या मध्यभागी आलं आहे. भवानी मातेची ही मूर्ती स्वयंभू आहे. एका भक्ताला ही मूर्ती विहिरीमध्ये सापडली होती. साधारणतः अडीच फुट उंचीची ही मूर्ती आहे. चतुर्भुज ही मूर्ती असून ही एका ठिकाणी या देवीची प्राणप्रतिष्ठा केली आहे. सोलापूरची देवी निद्राव्यस्थासाठी हलवली जाते, त्याप्रमाणे ही मूर्ती हलवली जात नाही. देवीचे हे काळ्या पाषाणातील रुप अत्यंत लोभसवाणे आहे.
देवीच्या मंदिराला प्रदक्षिणा मारण्यासाठी स्वतंत्र प्रदक्षिणा मार्ग आहे. त्याचबरोबर मंदिर परिसरामध्ये महिशासूरमर्दिनी देवी, विठ्ठल रुक्मिणी अशी छोटीखानी मंदिर आहेत. मंदिराचा परिसर आणि देवीचे रुप मनशांती देते. नवरात्रीमध्ये देवीचा उत्सव साजरा केला जातो. हजारो भाविक पुण्यातील भवानी आईच्या दर्शनाला येतात. अशी ही पुण्यातील भवानी आई भाविकांची रक्षणकर्ती असल्याची श्रद्धा भाविकांची आहे.
प्रिती माने