Caring for elders needs both law and love
पुणे/वैष्णवी सुळके : पालक आणि ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि कल्याण अधिनियम, 2007′ हा कायदा ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे आणि कल्याणाचे संरक्षण करण्यासाठी अंमलबजावणी करण्यात आली. या कायद्याचे उद्दीष्ट ज्येष्ठ नागरिकांच्या राहणीमानाचा सुधारुण त्यांना कुटुंबात मानाचे स्थान मिळावे हे आहे. आज मोठ्या प्रमाणात ज्येष्ठांवर अन्याय आणि अत्याचाराला सामोरे जावे लागते. परंतु, मुलांसाठी ते निमुटपणे सहन करत राहतात. त्यामुळे ज्येष्ठांनी भावनिक विचार न करता आपल्या हक्कासाठी या कायद्याची मदत घ्यायला हवी असे मत जनसेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विनोद शहा यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, या कायद्याची माहिती बर्याच ज्येष्ठ नागरिकांना नाही. शासनाने त्यांच्यासाठी केलेल्या या कायद्याबाबत ग्रामीण भागातील अनेक लोकांनाही माहिती नाही त्यामुळे याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. हे करण्यासाठी शासनाबरोबर विविध स्वयंसेवी संस्था, संघटनांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. तसेच ज्येष्ठांनी स्वतःच्या हक्कांसाठी या कायद्याचा आधार घेणे गरजेचे आहे.
वृद्धत्व हा आयुष्याचा अंतिम टप्पा नसून, तो अनुभवाचा आणि माणुसकीचा समृद्ध कालखंड आहे. मात्र, आजच्या यांत्रिक आणि वेगवान जगात हेच वृद्ध समाजातील सर्वाधिक दुर्लक्षित घटक ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर दरवर्षी १५ जून रोजी साजरा होणारा जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध जनजागृती दिन ही केवळ एक दिनविशेषाची औपचारिकता न राहता, ती एक सामाजिक साद ठरायला हवी.
या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे वृद्ध व्यक्तींवर होणाऱ्या छळाविरोधात जनजागृती करणे, समाजातील संवेदनशीलता वाढवणे आणि वृद्धांच्या हक्कांसाठी आवाज उठवणे. हा छळ फक्त शारीरिक किंवा मानसिक स्वरूपाचा नसतो, तर तो आर्थिक, भावनिक आणि सामाजिक उपेक्षेच्या स्वरूपातही जाणवतो.
हे देखील वाचा : Global Wind Day 2025: का साजरा केला जातो जागतिक पवन दिन? वाचा यामागील रंजक कारण
भारतासारख्या पारंपरिक कुटुंबव्यवस्था असलेल्या देशात वृद्धांवर होणारा छळ ही दुर्दैवी पण वास्तव बाब आहे. अनेक वृद्धांना त्यांच्या स्वतःच्या घरातच एकटेपणा, उपेक्षा आणि अपमानाचा सामना करावा लागतो. कधी त्यांच्या पेन्शनवर नजर असते, तर कधी त्यांची संपत्ती काढून घेण्यासाठी कौटुंबिक संघर्ष सुरू होतो.
आई वडिलांच्या प्रेमाच्या, मायेच्या ऊबेपेक्षा हल्ली त्यांचे पैसे हवेहवेसे वाटू लागतात. ज्यामुळे त्यांप्रती असलेल्या भावना, सहानुभूती पूर्णच नाहीशी होऊन ते नको नकोसे वाटतात. मग जबाबदारी झटकून मुले त्यांना वृद्धाश्रमाच्या दारी अगदी सहज सोडून येतात. यातून वृद्धांमध्ये नैराश्य, निराशा, आत्मविश्वासाचा अभाव आणि अनेकदा आत्महत्येचे विचारही डोकावतात.
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, दर सहा वृद्धांपैकी एकाला छळाचा अनुभव येतो. या संख्येत दरवर्षी वाढ होत आहे. दुर्दैवाने हे प्रकरण समाजात ‘खाजगी बाब’ म्हणून दुर्लक्षित केलं जातं. त्यामुळे याबाबत व्यापक जनजागृती होणं अत्यंत गरजेचं आहे.
वृद्धांचा छळ हा फक्त त्यांच्या कुटुंबाचे नाही, तर संपूर्ण समाजाचे अपयश दर्शवतो. त्यांच्यावरील अन्यायाविरोधात आवाज उठवणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्यांचं जीवन सन्मानाने आणि सुरक्षिततेने जगता यावं, यासाठी कायदेशीर संरक्षणाबरोबरच सामाजिक समर्पण आणि भावनिक साथदेखील तितकीच महत्त्वाची आहे.
हे देखील वाचा : Father’s Day 2025: ‘लई अवघड उमगाया बाप’! मुलाच्या आयुष्यात बापाचे प्रेम… ,असंही जगून पहावं!
वृद्धांचे महत्त्व केवळ त्यांच्या अनुभवापुरते मर्यादित नाही, तर ते आपल्या संस्कृतीचे जिवंत उदाहरण आहेत. त्यांचं अस्तित्व, त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांची साथ ही तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान आहे. फक्त आपल्याला त्याकडे पाहता यायला हवे. त्यांच्याशी नियमित संवाद साधणे, त्यांना सन्मानाने वागवणे, त्यांच्या गरजांना समजून घेणे ही फक्त एक जबाबदारी नव्हे तर आपली नैतिक आणि सामाजिक बांधिलकी आहे.