फादर्स डे 2025 - (फोटो- istockphoto)
पुणे/तेजस भागवत: आपल्या स्वप्नांना मागे ठेवून आपल्या लेकरांच्या भविष्याला आकार देण्यासाठी आयुष्यभर अपार कष्ट करणारा देह म्हणजे आपले वडील. मुलांच्या, कुटुंबाच्या आनंदासाठी कायमच आपली स्वप्ने मागे ठेवणाऱ्या जगातील सर्व वडिलांना ‘फादर्स डे’ च्या शुभेच्छा. आपल्या आयुष्यात आपल्या बाबांचे स्थान हे अत्यंत खास आणि महत्वाचे असते.
अगदी जन्माला आल्यापासून मोठे होईपर्यंत मुलांचे/मुलींचे सर्व लाड पुरवण्यासाठी कष्ट करणाऱ्या वाडिलांबद्दल लिहिण्यासाठी शब्द देखील अपुरे पडतील. हल्लीच्या काळात नोकरी किंवा व्यवसाय करून आपले घरचा लवणारे कर्ते पुरुष म्हणून आता वडिलांची ओळख मर्यादित राहिलेली नाही. वडिलांची भूमिका मुलांच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर बदलत जात असते.
वडील म्हणजे आपल्या कुटुंबाचा पाया आहे. वडील म्हणजे मुलाच्या मनात असलेला धीर, विश्वास. जेव्हा मी तुझ्या सोबत आहे असे वडील आपल्या लेकरांना सांगत असतात तेव्हा त्या मुलांच्या चेहऱ्याचा आत्मविश्वास हा गगनाला स्पर्श करणारा असतो. वडीलांशिवाय आपले कुटुंब पूर्ण होऊच शकत नाही. त्यामुळे त्यांच्याशिवाय घराच्या चार भिंतींना घरपण येऊ शकत नाही.
वडील आणि मुलीचे नाते हे अत्यंत घट्ट नाते समजले जाते. मात्र आज मला वडील आणि मुलगा या नात्यावर थोडेसे व्यक्त व्हावेसे वाटते. वडील आणि मुलगा यांच्यातील नाते थोडेसे अनोखे असते असे मला वाटते. मुली ज्या पद्धतीने आपल्या भावना आणि मनातील एखादी गोष्ट मोकळेपणाने वडिलांना सांगू शकतात. मात्र मुलगा आपले म्हणणे मोकळेपणाने सांगू शकत नाहीत. वडिलांना आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता कायम सतावत असते. त्या प्रमाणात मुलगा आपल्या आईजवळ लवकर व्यक्त होतो.
मुलांना वडिलांशी बोलताना त्यांच्या कठोरपणाचा आणि शिस्तीचा धाक असतो. आदरयुक्त भीती मनात असते. वडिल कठोर असले तरी त्यांचे मन हे अत्यंत हळवे आणि भावुक असते. आपल्या मुलाला येणाऱ्या अडचणी, होणारे दु:ख हे सर्व आपल्याला वडिलांना माहिती असते. एका विशिष्ठ वयानंतर मुलांना वडिलांशी बोलताना थोडी आदरयुक्त भीती वाटत असते. कदाचित लहानपणी लावलेली शिस्त किंवा चूक झाल्यावर पडलेला ओरडा असेल यामुळे मुलांच्या मनात वडिलांच्याबद्दल एक आदरयुक्त अशी भीती राहते. त्यांना पटकन आपल्या मनातले सांगता येत नाही.
मात्र यावर थोडासा विचार केला असता वडिलांनी देखील आपल्या मुलाशी मैत्रीचे नाते निर्माण केले पाहिजे. वडील म्हणून मुलावर धाक आणि लक्ष असलेच पाहिजे. पण त्यामध्ये आपल्याला मुलाला आपल्याशी मोकळेपणाने बोलता येईल अशी प्रेमाची किनार देखील असावी. त्यामुळे त्यांच्यातील नाते अजून सुदृढ आणि मजबूत होण्यास मदत होईल. मुलाला आपल्याशी सगळे काही व्यक्त करता यावे यासाठी मुलगा आणि वडील यांच्यात संवाद हा महत्वाचा दुवा ठरू शकतो.
वडिल म्हणजे साक्षात त्यागाची मूर्ती. कुटुंबाच्या आनंदासाठी आपले वडील त्यांच्या सर्व सुखांचा त्याग करतात. त्यांच्या आधाराशिवाय आपले आयुष्य अपूर्णच आहे.त्यांचा त्याग, कष्ट पाहता ‘लई अवघड हाय गड्या उमगाया बाप रं’ या ओळी आठवल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे आज फादर्स डे च्या निमिताने आयुष्यभर कष्ट करून आपल्या कुटुंबाला सुखी ठेवणाऱ्या, मुलांचे सर्व हट्ट पूर्ण करणाऱ्या वडिलांना खूप खूप शुभेच्छा..