conservation of sparrow birds is necessary in Maharashtra
शिक्रापूर : ‘चिऊ चिऊ ये, चारा खा, पाणी पी, भुर्र उडून जा’, बालपणीच होणारी चिमणीची ही ओळख आता धुसर होत आहे. हवामान बदलाचा परिणाम अन् वाढते शहरीकरण यामुळे राखाडी रंगाच्या सतत चिवचिवाट करून मंजुळ कालरव करणाऱ्या चिमण्या आता दिसेनाशा झाल्या आहेत. शहरचे काय पण अगदी खेड्यांमधूनही चिमण्यांचे अस्तित्तव शोधावे लागत आहे. मात्र, चांगले पर्यावरण जोपासण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या चिमण्यांचे संवर्धन करणे, तितकेच अत्यावश्यक आहे.
सध्या वाढत्या जागती करणामुळे सर्वत्र वेगवेगळा बदल होत असताना पशु पक्षांची संख्या देखील कमी होत असल्यामुळे भारतात २०१० पासून २० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिन सुरु करण्यात आला. मनुष्यवस्तीत माणसांच्या घराच्या छतावर राहून पिलांना जन्म देणारा पक्षी म्हणजे चिमणी. अलीकडील काळात शेतीसह जुनी दगड मातीची घरे नाहीसे होऊन सिमेंटची घरे व बंगले उभी राहत आहेत. तसेच मोबाईलचे टावर उभे राहिल्याने चिमण्यांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे, पूर्वीच्या काळी दारात आलेल्या चिमण्यांसह लहान लहान बालके खेळत होते तर चिमण्यांवर गाणी म्हणत बाळाची आई बाळांना खाऊ घालून झोपी लावत असे.
उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जागतिक चिमणी दिन येत असल्याने नागरिकांनी घराच्या जवळ आजूबाजूला चिमण्यांसाठी कुत्रिम घरटी ठेवून घरांच्या छतावर पक्षांसाठी दाने व पाणी ठेवण्याची आवश्यकता आहे. शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी काही शाळा तसेच पक्षीमित्रांच्या पुढाकाराने प्रत्येक वर्षी अनेक ठिकाणी डोंगरा सह नद्यांच्या कडेला गरजेनुसार पक्षांच्या अन्न पाण्याची तसेच कुत्रीम घरट्यांची व्यवस्था करण्यात येत असते. नेचर गार्ड ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष गणेश टिळेकर, निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख व वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत भाडळे हे यासाठी प्रयत्न करत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : फ्रान्स रशियासोबत आण्विक युद्धाच्या तयारीत; हायपरसॉनिक सुपर राफेल सज्ज
…इथल्या अंगणात बारा महिने असतो चिवचिवाट – पक्षी मित्र आश्पाक आत्तार यांचा उपक्रम; चिमण्यांसाठी घरटी, अन्नपाणी
‘पक्षीअंगणा’मध्ये चिमण्यांच्या चिवचिवाट अन् अन्य अनेक पक्ष्यांचा कायमचा जणू ‘राबता’ असतो. एकप्रकारे त्यांनी पक्ष्यांच्या रुपाने पर्यावरण जपण्याचा आदर्शच या परिसरात निर्माण केला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून आश्पाक यांनी आपल्या अंगणामध्ये चिमण्यांसाठी घरटी बनवली आहेत. तिथेच त्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे दररोज अनेक पक्षी त्यांच्या अंगणामध्ये विहार करत आहेत. त्यांच्या चिव चिवाट आणि किलबिलाटाने त्यांचा परिसर सतत गजबजलेला असतो.
चिमणी बरोबरच कबूतर, लाल बुडाचा पक्षी, डव पक्षी, कोकीळ, भारद्वाज असे अनेक वेगवेगळे पक्षी या अंगणामध्ये राबता आहे. पक्षी मित्र आष्पाक आत्तार यांच्यासह त्यांची पत्नी गुलजार आतार व त्यांचे संपूर्ण कुटुंब या पक्षांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी कार्यरत असतात. त्यामुळे त्यांच्या अंगणातील वातावरण आल्हादायक बनले आहे. त्यांच्या अंगणात वेगवेगळ्या जातीची फळ आणि फुल झाडे आहेत. त्यामुळे सतत या झाडांवर वेगळ्या जातीच्या पक्षांचा राबता आहे. चिमण्यांची घटती संख्या पर्यावरणासाठी धोकादायक आहे हे लक्षात घेऊन प्रसार माध्यम तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षीमित्र आष्पाक आत्तार सतत पक्षांविषयी जनजागृती करत असतात.
चांदोली परिसरातील वारणावती या त्यांच्या मूळ गावी तर वेगवेगळ्या पक्षांसह मोर दररोज सकाळी त्यांच्या अंगणामध्ये हजेरी लावतो. चिमणीच्या संरक्षणासाठी जागरूकता निर्माण करणे,चिमणीच्या घटत्या संख्येवर लक्ष देणे आणि त्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे या दृष्टीने पक्षी मित्र आष्पाक आत्तार राबवत असलेले उपक्रम सर्वांगीण पर्यावरणीय आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. समाजातील प्रत्येक घटकाने ते आज राबवण्याची गरज आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानच्या अस्तित्वाला धोका! बलुच हल्ल्यानंतर लष्करप्रमुखांनी शाहबाज सरकारविरुद्ध पुकारले युद्ध
पर्यावरणासाठी धोक्याची घंटा
संपूर्ण जगभरात २० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. महंमद दिलावर यांनी २००६ मध्ये ‘नेचर फॉरेव्हर सोसायटी’ नावाची एक संस्था स्थापन केली होती. या संस्थेच्या पुढाकारातून २०१० पासून हा जागतिक चिमणी दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. निसर्गाच्या अन्नसाखळीत प्राणी पक्षांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मात्र आधुनिक युगात वाढते शहरीकरण, वाढतं प्रदूषण, आधुनिकीकरण यामुळे चिमण्यांसह अनेक पक्षांच्या जाती नामशेष होऊ लागल्या आहेत. चिमण्यांची संख्या कमी होणे, ही पर्यावरणाच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा आहे. त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करणे आज काळाची गरज आहे.