
crpf raising day july 27 history significance marathi news
भारताची अखंडता, शांतता आणि देशांतर्गत सुरक्षा अबाधित राखण्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (CRPF) योगदान अत्यंत मोलाचे राहिलेले आहे. दरवर्षी २७ जुलै रोजी संपूर्ण देशात ‘सीआरपीएफ स्थापना दिवस’ (CRPF Raising Day) अत्यंत उत्साहात आणि आदराने साजरा केला जातो. या दिवशी केवळ या दलाच्या गौरवशाली वाटचालीचे स्मरण केले जात नाही, तर देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर सैनिकांच्या सर्वोच्च बलिदानाला कृतज्ञतापूर्वक सलामही केला जातो. ३ लाख २४ हजारांहून अधिक जवानांचे भक्कम बळ असलेले हे दल आज जगातील सर्वात मोठ्या निमलष्करी बलांपैकी एक म्हणून ओळखले जाते.
सीआरपीएफचा इतिहास स्वातंत्र्यापूर्वीच्या ब्रिटीश काळातील आहे. २७ जुलै १९३९ रोजी मध्य प्रदेशातील नीमच येथे ‘क्राउन रिप्रेंटेटिव्हज पोलिस’ (CRP) म्हणून या दलाची स्थापना करण्यात आली होती. त्या वेळी ब्रिटीश राजवटीत संस्थानांमधील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळणे ही या दलाची प्राथमिक जबाबदारी होती.
परंतु, १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री आणि ‘लोहपुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल यांनी या दलाचे महत्त्व अचूक ओळखले. स्वतंत्र भारतातील विविध संस्थानांचे विलीनीकरण आणि अंतर्गत सुरक्षा राखण्यासाठी एका मजबूत केंद्रीय दलाची गरज होती. सरदार पटेलांच्या दूरदृष्टीतून २८ डिसेंबर १९४९ रोजी केंद्रीय विधानसभेत कायदा संमत करून या दलाचे नाव ‘केंद्रीय राखीव पोलिस दल’ (Central Reserve Police Force – CRPF) असे ठेवण्यात आले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nepal News: 10 वर्षांनंतर नेपाळमध्ये 200, 500च्या नोटांची जोरदार एन्ट्री; भारतीय चलनाबाबत सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय
सीआरपीएफ हे केवळ अंतर्गत शांततेचे रक्षण करणारे दल राहिलेले नाही, तर गरजेच्या वेळी देशाच्या सीमांचे रक्षण करण्यातही या जवानांनी अतुलनीय पराक्रम गाजवला आहे. १९५९ मध्ये लडाखमधील हॉट स्प्रिंग्स (Hot Springs) येथे चिनी सैनिकांशी लढा देताना सीआरपीएफच्या १० जवानांनी हौतात्म्य पत्करले. त्यांच्या या बलिदानाच्या स्मणार्थ दरवर्षी २१ ऑक्टोबर हा दिवस ‘पोलिस स्मृतिदिन’ (Police Commemoration Day) म्हणून पाळला जातो. इतकेच नव्हे, तर १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान गुजरातच्या रण ऑफ कच्छमधील ‘सरदार पोस्ट’ (Sardar Post) वर सीआरपीएफच्या अवघ्या एका तुकडीने पाकिस्तानच्या संपूर्ण ब्रिगेडचा हल्ला उधळून लावला होता. या ऐतिहासिक विजयाची आठवण म्हणून ९ एप्रिल हा दिवस ‘शौर्य दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
काळानुसार देशासमोरील आव्हाने बदलत गेली, तशी सीआरपीएफची भूमिका अधिक व्यापक झाली. आज देशातील डाव्या विचारसरणीच्या उग्रवादाचा (नक्षलवाद) बीमोड करण्यात सीआरपीएफ सर्वात आघाडीवर आहे. छत्तीसगड, झारखंड, ओडिशा आणि महाराष्ट्रातील गडचिरोलीसारख्या अत्यंत दुर्गम व घनदाट जंगलात नक्षलवाद्यांशी दोन हात करण्यासाठी या दलाची विशेष विंग ‘कोब्रा’ (CoBRA – Commando Battalion for Resolute Action) कार्यरत आहे. या शूर कमांडोंच्या धैर्यामुळे आज देशातील नक्षलग्रस्त भागात मोठी घट झाली आहे.
देशात जातीय दंगली किंवा कायदा व सुव्यवस्थेची गंभीर समस्या निर्माण झाल्यास सर्वप्रथम सीआरपीएफच्या ‘रॅपिड ॲक्शन फोर्स’ची (RAF) मदत घेतली जाते. १९९२ मध्ये स्थापन झालेली ही तुकडी अत्यंत संवेदनशील परिस्थितीत कमीत कमी वेळेत दंगल नियंत्रणात आणण्यासाठी ओळखली जाते. याव्यतिरिक्त, व्हीआयपी सुरक्षा, संसद भवनाची सुरक्षा, अमरनाथ यात्रा, माता वैष्णोदेवी मंदिर आणि अयोध्या यांसारख्या अत्यंत संवेदनशील धार्मिक व राष्ट्रीय स्थळांच्या रक्षणाची जबाबदारीही सीआरपीएफ अत्यंत समर्थपणे पेलत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Alert: युद्धसंघर्षाचा अग्निकुंड आणखी पेटणार; कॅस्पियन समुद्रात युक्रेनचा इराणी लष्करी जहाजावर भीषण हल्ला; तेहरानचा संताप
महिला सशक्तीकरणातही सीआरपीएफने जगात नवा वस्तुपाठ निर्माण केला आहे. १९८६ मध्ये सीआरपीएफने भारतातील पहिली महिला सशस्त्र बटालियन उभारली. त्यानंतर २००६ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या (UN) लायबेरिया शांतता मोहिमेवर (UNMIL) संपूर्ण महिला तुकडी पाठवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला, ज्याचे नेतृत्व सीआरपीएफच्या महिला सैनिकांनी केले होते.
भारतातील लोकशाहीचा सण मानल्या जाणाऱ्या निवडणुका शांततेत आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडणे, ही सीआरपीएफची मोठी जबाबदारी असते. संवेदनशील भागांत मतदारांना भीतीमुक्त वातावरणात मतदान करता यावे यासाठी हे जवान अहोरात्र पहारा देतात. याशिवाय नैसर्गिक आपत्ती जसे की भूकंप, पूर किंवा त्सुनामीच्या काळातही सीआरपीएफ जवान स्थानिक प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून बचावकार्यात मोलाची मदत करतात.
२७ जुलैचा हा स्थापना दिवस आपल्याला या जवानांच्या आणि त्यांच्या कुटुंबांच्या त्यागाची जाणीव करून देतो. भर उन्हात, चिखलात, बर्फाच्छादित शिखरांवर आणि घनदाट जंगलात कुटुंबियांपासून दूर राहून आपले कर्तव्य बजावणाऱ्या सीआरपीएफच्या प्रत्येक जवानाला आणि हुतात्म्यांना संपूर्ण देशाचा सलाम!