सुनयना सोनवणे/पुणे: आज प्लास्टिकचा वापर प्रत्येक ठिकाणी होताना दिसतो. बाजारातून आणलेल्या वस्तूंपासून ते पाण्याच्या बाटल्यांपर्यंत सर्वत्र प्लास्टिकचीच भरमार आहे. मात्र, या वापरलेल्या प्लास्टिकची विल्हेवाट कशी लावायची हा मोठा प्रश्न आहे. प्लास्टिकचे सहज विघटन होत नाही. तो कचरा स्वरूपात निसर्गात राहून प्रदूषण निर्माण करतो. त्यामुळे जमिनीची पोषकता कमी होते, प्राण्यांचे जीव धोक्यात येतात, पर्यावरणास गंभीर समस्या निर्माण होते. या समस्येवर उपाय म्हणून प्लास्टिक पुनर्वापराची संकल्पना पुढे आली. अन्नाचे बॉक्स पॅक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पॉलिथिन पिशव्यांपासून ते अन्नाचे पॅकेट, डिटर्जंट पॅकपर्यंत आपण दिवसेंदिवस वेगवेगळ्या स्वरूपात प्लास्टिकचा वापर करतो. एकदा टाकून दिल्यानंतर, आपण त्यांचे अस्तित्व विसरून जातो. पण त्याचे एकत्रीकरण करून ‘इकोकारी’ दैनंदिन वापराच्या वस्तूंमध्ये रूपांतर करत आहे. नंदन भट यांची ही संस्था आहे. २०२० च्या कोविड काळात त्यांनी इकोकारीची सुरुवात केली.
वापरलेल्या प्लास्टिकचे योग्य रीतीने संकलन करून त्याचे चरख्याच्या माध्यमातून सूक्ष्म धाग्यांमध्ये रूपांतर केले जाते. हे धागे नुसतेच टिकाऊ नसतात तर रंगीत आणि आकर्षकही बनतात. असे धागे नंतर हातमागाच्या मशीनवर वापरून त्याचे मोठे कापडासारखे तुकडे विणले जातात. त्या कापडापासून विविध वस्तू बनवल्या जातात. यात पर्स, बॅगा, चटया, पायपुसणे व शोभेच्या वस्तू, लॅपटॉप बॅग, डायरी कव्हर, पाकीट, प्लांटर्स, टेबल रनर अशा कितीतरी वस्तू तयार केल्या जातात. या वस्तू आकर्षक दिसतात, किफायतशीर असतात आणि पर्यावरणस्नेहीही ठरतात.
हातमागावरील काम हे भारताची पारंपरिक कला असल्यामुळे या नव्या प्रयोगाला एक वेगळेच महत्त्व आहे. आणि यासाठी ‘इकोकारी’ ही पुणेस्थित स्टार्टअप कंपनी नावारूपाला येत आहे. ही प्रक्रिया चरखा आणि हातमाग यंत्रावर जास्त अवलंबून असल्यामुळे विजेचा वापरही अतिशय कमी प्रमाणात होतो. त्याचबरोबर आपली चरखा, हातमाग, विणकाम अशा पारंपारिक पद्धतही पुढच्या पिढीकडे जात आहे. या उपक्रमाचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे एकीकडे पर्यावरणाचे रक्षण होते, तर दुसरीकडे लोकांना रोजगार मिळतो. कारागिरांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे.
या वस्तूंचा वापर कॉर्पोरेट क्षेत्रात भेटवस्तू देण्यासाठी म्हणून जास्त प्रमाणात होतो. अगदी दोनशे रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंत विविध प्रकारच्या वस्तू येथे उपलब्ध आहेत. या वस्तू त्यांच्या ऑनलाइन वेबसाईटवरून मागवता येतात.
प्लास्टिक कचऱ्याचा भार कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या उद्योगांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या प्रकल्पांमुळे स्वच्छ पर्यावरण, उपयुक्त वस्तू आणि रोजगारनिर्मिती या तिन्ही गोष्टी साध्य होतात. विशेष म्हणजे या प्रकल्पाचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातही केले आहे. ज्याची कल्पना संस्थापक नंदन भट यांनाही नव्हती. या उल्लेखानंतर मात्र सगळीकडून त्यांच्या या संकल्पनेचे कौतुक केले गेले.
‘माझा जन्म काश्मीरचा असल्यामुळे मी निसर्गाच्या सानिध्यात वाढलो आहे. १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात जेव्हा मी माझ्या शिक्षणासाठी महाराष्ट्रात आलो, तेव्हा मी आणि माझ्या मित्रांनी एक ट्रेकिंग ग्रुप तयार केला. ट्रेकिंग करताना आम्हाला आढळले की येणारे पर्यटक प्लास्टिक टाकतात. प्लास्टिकच्या बाटल्या आणि काचेच्या बाटल्या कचरा वेचकांकडून उचलला जातो कारण त्यातून पैसे मिळतात. पण कोणीही कचरा पिशव्या गोळा करत नाही, कारण त्यांचे कोणतेही व्यावसायिक मूल्य नाही. म्हणून आम्हाला वाटले की आपण या कचऱ्यातून काहीतरी करू शकतो, आणि आम्ही ‘इकोकारी’ची सुरुवात केली.’
– नंदन भट,
संस्थापक, इकोकारी.