Halal Township Near Mumbai : अलिकडेच मुंबईजवळील कर्जत नायल परिसरात एक नवीन रिअल इस्टेट प्रकल्प समोर आला आहे, जो बिल्डर “हलाल लाइफस्टाइल टाउनशिप” किंवा “हलाल अपार्टमेंट” म्हणून विक्रीसाठी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या सोसायटीच्या जाहिरातीत स्पष्टपणे म्हटले आहे की ते फक्त मुस्लिम समुदायासाठी घरे आणि समुदाय-आधारित सुविधा पुरवण्यात येणार आहेत. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यावरून वाद निर्माण झाला.
विरोधकांनी याला धार्मिक आधारावर भेदभाव आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न असल्याची टीका केली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनएचआरसी) याची दखल घेतली असून या वादाचे मुख्य कारण म्हणजे हलाल कॉलनी किंवा हलाल अपार्टमेंट हे संविधानाच्या समानतेच्या आणि भेदभाव न करण्याच्या तत्त्वांच्या विरुद्ध असल्याचेही म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते कृष्णा हेगडे यांनी जाहिरातीच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ती जाहीरात मागे घेण्याची मागणी केली आहे. भाजप आणि इतर राजकीय पक्षांनीही या प्रकल्पावर टीका केली. याशिवाय मानवाधिकार संरक्षण कायदा, १९९३ च्या कलम १२ अंतर्गत NHRC ने महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांना नोटीस पाठवण्यात आली असून हा प्रकल्प कोणत्या कायदेशीर आधारावर मंजूर करण्यात आला याचा अहवाल दोन आठवड्यात सादर करण्यात यावा, असे आदेशही दिले आहेत. भारतात आतापर्यंत हलाल वसाहत नाही, परंतु काही मुस्लिम देशांमध्ये या संकल्पनेवर वसाहती बांधण्यात आल्या आहेत. मग “हलाल घर” किंवा “हलाल कॉलनी” चा अर्थ असाही प्रश्न अनेकदा पडतो.
हलाल म्हणजे काय?
हलाल हा एक अरबी शब्द असून, याचा अर्थ “परवानगीयोग्य”, “कायदेशीर” किंवा “धर्मशास्त्रानुसार योग्य” असा होतो. इस्लाम धर्मात हलाल म्हणजे अशा गोष्टी, कृत्ये किंवा अन्नपदार्थ, जे शरियत (इस्लामिक कायदा) आणि धार्मिक मार्गदर्शनानुसार वापरणे, करणे किंवा सेवन करणे अनुमत आहे. हलाल संकल्पना केवळ अन्नापुरती मर्यादित नसून ती आर्थिक व्यवहार, कपडे, औषधे आणि जीवनशैलीशी संबंधित असते. हलाल मांस म्हणजे इस्लामिक पद्धतीने, विशिष्ट धार्मिक विधीनुसार वध केलेल्या प्राण्याचे मांस. ही पद्धत धार्मिक शुचिता आणि नियमांचे पालन करत अन्न तयार करण्यावर भर देते. इस्लाममध्ये हलाल गोष्टींचा अर्थ — खाणे, कमवणे किंवा वापरणे — हे सर्व काही धर्मसन्मत व नैतिकतेच्या चौकटीत असावे, असा असतो. त्यामुळे “हलाल” ही संकल्पना इस्लामिक जीवनशैलीच्या केंद्रस्थानी आहे.
Bank Holiday: ६ सप्टेंबरला ‘या’ शहरांमध्ये बँका बंद! तुमच्या शहरातील स्थिती जाणून घ्या
हलाल घर किंवा हलाल कॉलनी म्हणजे असे निवासी प्रकल्प किंवा वसाहती, जे मुस्लिम समुदायाच्या धार्मिक गरजा आणि हलाल जीवनशैली लक्षात घेऊन नियोजित व उभारले गेलेले असतात.या वसाहतींचा मुख्य उद्देश म्हणजे मुस्लीम कुटुंबांना असे वातावरण उपलब्ध करून देणे जिथे त्यांना इस्लामिक नियम, अन्न, प्रार्थना आणि धार्मिक परंपरा पाळण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
अशा वसाहतींमध्ये सहसा मशिदी, इस्लामिक शाळा किंवा मदरसे, हलाल प्रमाणित अन्नाची उपलब्धता, पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र सार्वजनिक सुविधा, अल्कोहोल व इतर निषिद्ध गोष्टींवर बंदी,इत्यादी सुविधा असतात. या प्रकल्पांमध्ये प्राधान्याने तेच लोक वास्तव्यास येतात जे इस्लामिक जीवनशैलीचे पालन करतात. त्यामुळे अशा वसाहतींना अनेकदा “हलाल जीवनशैली टाउनशिप” असेही संबोधले जाते.
मुस्लिम बहुल देश आणि पाश्चिमात्य देशांतील मुस्लिम समुदायांमध्ये “हलाल जीवनशैली गृहनिर्माण” संकल्पना आकार घेत आहे.
मलेशिया आणि इंडोनेशिया : हलाल जीवनशैली गृहनिर्माण प्रकल्प सुरू झाले आहेत. मलेशियामध्ये मलेशिया हलाल पार्क आणि शाह आलम परिसरात अशा वसाहती बांधल्या गेल्या आहेत. यात हलाल प्रमाणित फूड कोर्ट, मशिदी आणि इस्लामिक बँकिंग सुविधा असतात.
आखाती देश : संयुक्त अरब अमिराती व इतर आखाती देशांत शरिया-अनुपालन गृहनिर्माण किंवा इस्लामिक टाउनशिप प्रकल्प आहेत. या ठिकाणी दारू, डुकराचे मांस, नाइट क्लब आदी गोष्टींना परवानगी नसते.
पाश्चिमात्य देश : ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमध्ये स्थलांतरित मुस्लिम समाजाने हलाल जीवनशैली गृहनिर्माण संस्थांची मागणी केली आहे. येथे लहान वसाहती किंवा सोसायट्या उभ्या राहिल्या आहेत, ज्यात हलाल अन्न, महिलांसाठी स्वतंत्र जिम-पूल सुविधा आणि इस्लामिक नियमांनुसार डिझाइन केलेली घरे आहेत. ब्रिटनमध्ये बर्मिंगहॅम आणि ईस्ट लंडनमध्ये अशा गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत.
युरोपातील उदाहरणे : जर्मनीतील कोलोन, नेदरलँड्समधील रॉटरडॅम, तसेच फ्रान्सच्या काही उपनगरांमध्ये मुस्लिम समुदाय-आधारित प्रकल्प झाले आहेत. हे बहुतेकदा इस्लामिक गृहनिर्माण सहकारी संस्था किंवा शरिया-अनुपालन कर्ज योजनेच्या स्वरूपात असतात, ज्यामुळे व्याज न देता घर खरेदी करता येते. तथापि, युरोपमध्ये संवैधानिक निर्बंधांमुळे “फक्त मुस्लिमांसाठी कॉलनी” औपचारिकरित्या मान्य नाही. महत्त्वाचे म्हणजे युरोप व अमेरिकेत फक्त मुस्लिमांसाठी अपार्टमेंट विकणे/खरेदी करणे बेकायदेशीर आहे, कारण त्यांच्या संविधानात धर्म/जातीवर आधारित भेदभाव मान्य नाही.