Navarashtra Governance Award 2025
पुणे : शासकीय अधिकाऱ्यांच्या दालनात सर्वसामान्य नागरिक आला तर, तो आपल्या कुटुंबातील कोणा व्यक्तीला भेटायला आला आहे. अशी प्रचिती त्या नागरिकाला आली पाहिजे, असा दृष्टीकोन ठेऊन शासकीय अधिकाऱ्यांनी काम करावे. गरीबांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे, त्यामुळे असे काम करा की स्थानिक नागरिक आयुष्यभर आपले नाव काढतील, असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. राज्यात लोकप्रिय माध्यमांमध्ये मानाचे स्थान मिळविणाऱ्या नवभारत नवराष्ट्र समुहाच्या वतीने, शनिवारी पश्चिम महाराष्ट्रातील शासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचा नवराष्ट्र गर्व्हनर्स अवॉर्ड २०२५ देऊन दत्तात्रय भरणे व पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुंडकुलवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील ४७ शासकीय अधिकार्यांचा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
भरणे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील नगर परिषद, नगरपालिका व अन्य शासकीय संस्थांमधील अधिकाऱ्यांचा नवराष्ट्रकडून सन्मान होत आहे ही आनंददायी बाब आहे. आज ज्यांना पुरस्कार मिळाला ते आपल्या कामाचे सातत्य कायम ठेवतील याबाबत आपल्या मनात शंका नाही. आज शहरीकरण वाढत आहे, अशावेळी या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकार्यांना विविध विषयांचे नियोजन करावे लागणार आहे. शहरातील, गावांमधील स्वच्छता आजमितीला खूप महत्वाची आहे. त्यामुळे कचऱ्याचे नियोजन करताना, प्लॅस्टिकमुक्त शहर गाव असले पाहिजे. मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख म्हणून काम करण्याची संधी तुम्हा अधिकाऱ्यांना मिळाली आहे. अशावेळी तुम्ही सर्व सामान्यांसाठी काम केले पाहिजे. जेथे काम करत आहात तेथील नागरिकांनी तुमचे आयुष्यभर नाव काढले पाहिजे असे काम करावे अशी अपेक्षा भरणे यांनी व्यक्त केली.
शासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या दालनातून बाहेर पडून सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेऊन, गरिबांसाठी काम केले पाहिजे. यासाठी शहरातील संबंधित नगरपालिका, नगरपरिषद येथील झोपडपट्टी भागात, मागासवर्गीय वस्तीत जाऊन काम करणे गरजेचे आहे. कारण गरिबांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. तुम्ही काम करताना कायद्याच्या चौकटीत करत असता, याची नोंद सर्वत्र घेतली जात असते. अधिकारी नव्हे तर आपल्या कुटुंबातील व्यक्तीकडे काम घेऊन आलो आहे अशी भावना नागरिकांच्या मनात आली पाहिजे. आपले काम नक्की होणार हा विश्वास त्याला मिळाला पाहिजे असे अधिकाऱ्यांनी वागावे. आनंद घ्या व आनंद द्या, जेवढे लोकांच्या उपयोगी आपण पडू असे काम अधिकाऱ्यांनी केले पाहिजे, असेही यावेळी दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
नवराष्ट्रकडून होणारा गुणगौरव हुरूप आणणारा – डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार
नवराष्ट्रकडून नागरी संस्था व समाजातील चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा जो सत्काराचा हा कार्यक्रम घेतला तो आनंददायी आहे. नवराष्ट्रकडून होणारा हा गुणगौरव हा अधिकाऱ्यांना आणखी चांगले काम करण्यासाठी हुरूप आणणारा आहे. अशा शब्दात पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी नवराष्ट्रच्या कार्याचा गौरव केला.
डॉ. पुलकुंडवार म्हणाले, माझ्या विभागातील म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रातील अधिकारी एवढे चांगले काम करतात याचा मला अभिमान आहे. ग्रामीण भागात पूर्वी खूपच खराब चित्र होते. शौचालय नाही, कचरा कुंडीची वानवा, रस्त्यांची दुरावस्था. पण याची जाणीव व्हायला सन २०१४ उजाडले. आज स्वच्छ भारत मोहिम सुरू झाली आहे. प्रत्येक गावातील घरात शौचालय आपण देऊ शकलो, पण यापुढे या स्वच्छता मोहिमेत आपल्याला आणखी चांगले काम करायचे आहे. इंदोर शहर गेली आठ वर्षे स्वच्छ भारत मोहिमेत सातत्याने प्रथम येत आहे. पण एवढ्या एका शहरापुरते न थांबता आपल्याला आपली सर्व शहरे स्वच्छतेत पुढे आणली पाहिजेत. यात शासकीय यंत्रणा, प्रसारमाध्यमे व नागरिकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
जे अधिकारी चांगले काम करतात, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम नवराष्ट्र व नवभारत करत आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. असे सांगून डॉ. पुलकुंडवार म्हणाले, कुठलाही व्यवसाय आपण स्विकारतो त्यावेळी त्याचा पहिला उद्देश हा आपला व आपल्या कुटुंबाचा चरितार्थ असतो. अशावेळी चांगले काम करणाऱ्यांची निवड ही परिक्षणातून झाली पाहिजे. आपल्याला जी संधी मिळाली आहे, त्याचा वापर करून अधिकाऱ्यांनी चांगले काम करून समाजाचे उतराई होण्यासाठी कार्यरत राहिले पाहिजे. शासकीय अधिकार्यांनी कुठल्याही कामाला नाही न म्हणता हो म्हणणे जरूरी आहे ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांची ही शिकवण खूप महत्वाची आहे.
आज स्पर्धा परिक्षांमध्ये निवड होणारे उमेदवार हे मध्यम व गरिब कुटुंबातून आलेले आहेत. त्यामुळे या सर्व घटकांच्यासाठी या अधिकार्यांनी काम केले पाहिजे. स्वच्छता, पर्यावरण, पाण्याचे प्रदुषण रोखणे यासाठी प्रशासकीय यंत्रणेने जोमाने काम केले पाहिजे. यावेळी प्रसारमाध्यमांचे काम हे आरश्यासारखे असते. त्यामुळे एक पुरस्कार मिळाला म्हणून समाधान न मानता आपल्या कामात सातत्य ठेवावे, असे काम करावे की त्यातून इतरांनी प्रेरणा घेतली पाहिजे. असे डॉ. पुलकुंडवार यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमात गौरविण्यात आलेले नवराष्ट्र गर्व्हनर्स अवॉर्ड २०२५ चे पुरस्कारर्थी
१. स्मिता काळे, उपायुक्त नवी मुंबई महानगरपालिका
२. संजय धनशेट्टी, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद, सोलापूर
३. अमोल जाधव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर
४. विक्रमसिंह पाटील, मुख्याधिकारी विटा नगरपरिषद जिल्हा सांगली
५. लक्ष्मण राठोड, मुख्याधिकारी जत नगरपरिषद जिल्हा सांगली
६. सुधाकर लेंडवे, मुख्याधिकारी तासगाव नगरपरिषद जिल्हा सांगली
७. पृथ्वीराज पाटील, मुख्याधिकारी इस्लामपूर नगरपरिषद जिल्हा सांगली
८. सचिन तपसे, मुख्याधिकारी तथा प्रशासक करमाळा नगर परिषद जिल्हा सोलापूर
९. रमाकांत काळे, मुख्याधिकारी तथा प्रशासक अक्कलकोट नगरपरिषद जिल्हा सोलापूर
१०. अर्जुन सुरवसे, प्रशासक मैदर्गी नगरपालिका जिल्हा सोलापूर
११. महेश रोकडे, मुख्याधिकारी पंढरपूर नगरपालिका जिल्हा सोलापूर
१२. अजय पाटणकर, मुख्याधिकारी कागल नगरपरिषद जिल्हा कोल्हापूर
१३. विशाल पाटील, मुख्याधिकारी कुरूंदवाड नगरपरिषद ता. शिरोळ जिल्हा कोल्हापूर
१४. आतिश वाळुंज, मुख्याधिकारी मुरगुड नगरपरिषद, जिल्हा कोल्हापूर
१५. सुमित जाधव, मुख्याधिकारी, पेठ वडगाव नगरपरिषद ता हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर
१६. देवानंद ढेकळे, मुख्याधिकारी गडहिंगलज नगरपरिषद, जिल्हा कोल्हापूर
१७. चेतनकुमार माळी, मुख्याधिकारी पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषद जिल्हा कोल्हापूर
१८. डॉ. सचिन माने, मुख्याधिकारी म्हसवड नगरपरिषद, जिल्हा सातारा
१९. विनोद जळक, मुख्याधिकारी रहिमतपूर नगरपरिषद जिल्हा सातारा
२०. डॉ.कल्याण हुलगे, मुख्याधिकारी खंडाळा नगरपंचायत जिल्हा सातारा
२१. पंडीत पाटील, मुख्याधिकारी पाचगणी नगरपरिषद जिल्हा सातारा
२२. प्रताप कोळी, मुख्याधिकारी मलकापूर नगरपरिषद जिल्हा सातारा
२३. संजीवनी दळवी, मुख्याधिकारी, वाई नगरपरिषद जिल्हा सातारा
२४. चेतन कोंडे, मुख्याधिकारी खंडाळा नगरपरिषद जिल्हा सातारा
२५. प्रशांत व्हटकर, मुख्याधिकारी कराड नगरपरिषद जिल्हा सातारा
२६. विनोद जळक, मुख्याधिकारी कोरेगाव नगरपंचायत जिल्हा सातारा
२७. अभिजित बापट, मुख्याधिकारी सातारा नगरपरिषद जिल्हा सातारा
२८. योगेश पाटील, मुख्याधिकारी महाबळेश्वर गिरीस्थान जिल्हा सातारा
२९. पराग कोडगुले, मुख्याधिकारी मेढा नगरपंचायत जिल्हा सातारा
३०. दत्तात्रय गायकवाड, मुख्याधिकारी लोणंद नगरपंयाचत
३१. गजानन शिंदे, मुख्याधिकारी, भोर नगरपरिषद
३२. डॉ.पंकज भुसे, मुख्याधिकारी बारामती नगरपरिषद
३३. रमेश ढगे, मुख्याधिकारी, इंदापूर नगरपरिषद
३४. अवधूत तावडे, मुख्याधिकारी, दौंड नगरपरिषद
३५. बालाजी लोंढे, मुख्याधिकारी, माळेगाव बुद्रुक नगरपंचायत ता. बारामती जि. पुणे
३६. डॉ.कैलास चव्हाण, मुख्याधिकारी सासवड नगरपरिषद
३७. चारूदत्त इंगुले, मुख्याधिकारी जेजुरी नगरपरिषद
३८. चेतन कोंडे, मुख्याधिकारी देहू नगरपंचायत देहू जिल्हा पुणे
३९. अशोक साबळे, मुख्याधिकारी, लोणावळा नगरपरिषद जिल्हा पुणे
४०. अंबादास गर्कळ, मुख्याधिकारी राजगुरूनगर नगरपरिषद जिल्हा पुणे
४१. अंकुश जाधव, मुख्याधिकारी चाकण नगरपरिषद जिल्हा पुणे
४२. माधव खांडेकर, मुख्याधिकारी, आळंदी नगरपरिषद जिल्हा पुणे
४३. डॉ.चरण कोल्हे, मुख्याधिकारी, जुन्नर नगरपरिषद जिल्हा पुणे
४४. प्रीतम पाटील, मुख्याधिकारी, शिरूर नगरपरिषद जिल्हा पुणे
४५. विजयकुमार सरनाईक, मुख्याधिकारी तळेगाव नगरपरिषद जिल्हा पुणे
४६. प्रवीण निकम, मुख्याधिकारी, वडगाव नगरपंचायत जिल्हा पुणे
४७. माधव खांडेकर मुख्याधिकारी आळंदी नगरपरिषद जिल्हा पुणे.