Navarashtra Award 2025
सोलापूर : ‘नवराष्ट्र’ने सोलापूर आणि महाराष्ट्रातील लोकांचे प्रश्न प्रामाणिकपणे मांडले. ‘आयकॉन सोलापूर’सारखा पुरस्कार सोहळा आयोजित करून स्थानिक गुणवंतांचा केलेला गौरव अत्यंत कौतुकास्पद आहे. यातून समाजातील नव्या पिढीला दिशा मिळेल. हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे गाैरवाेद्गार खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी काढले.
दैनिक नवभारत वृत्तपत्र समूहाच्या दैनिक नवराष्ट्र साेलापूरच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘आयकॉन सोलापूर’ पुरस्कार सोहळा येथील हिराचंद नेमचंद वाचनालयातील किर्लोस्कर सभागृहात झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बाेलत हाेते. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, माजी प्राचार्य राजाभाऊ लोखंडे यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, उद्योग क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमात उद्योजक कुमार करजगी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, ज्येष्ठ लेखक आणि श्री हिराचंद नेमचंद वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर, आरटीओ महेश रायबान यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लखेनीय कार्य करणाऱ्या २५ मान्यवरांचा ‘आयकॉन सोलापूर’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. पुरस्कार विजेत्यांच्या नावांची घोषणा होताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. सोहळ्यात आनंद, अभिमान व प्रेरणा यांचा संगम दिसून आला. ऐश्वर्या हिबारे यांनी सूत्रसंचालन केले.
समाजासाठी काम करणाऱ्यांचा गाैरव
खासदार मोहिते पाटील पाटील म्हणाले, पत्रकारिता हा समाजाचा चौथा स्तंभ आहे. समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे व लोकशाही बळकट करण्याचे काम माध्यमांनी नेहमीच केले आहे. पुरस्कार म्हणजे समाजासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव आहे. त्यांच्या योगदानामुळे सोलापूरची ओळख अधिक दृढ झाली आहे. ‘आयकॉन सोलापूर’ दिशादर्शक आणि समाजाला प्रेरणादायी ठरणारा आहे.
सोलापूरची वाटचाल चर्चासत्र
सोलापूरची वाटचाल विषयावर झालेल्या चर्चासत्रात ज्येष्ठ उद्योजक कुमार करजगी, सोलापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश साठे, मोहोळ तालुका काँग्रेस कमिटीचे सुलेमान तांबोळी, ज्येष्ठ लेखक श्रीकांत तळेगावकर यांच्यासह मान्यवरांनी सहभाग घेतला.
सोलापूरच्या प्रगतीला उजाळा
दैनिक नवराष्ट्रच्या वर्धापन दिनानिमित्त साजरा झालेला हा ‘आयकॉन सोलापूर’ सोहळा केवळ पुरस्कार वितरणापुरता मर्यादित न राहता समाजासाठी प्रेरणादायी ठरला. विविध क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण केलेल्या व्यक्तींचा गौरव झाल्याने सोलापूरच्या प्रगतीचे चित्र उजळून निघाले.