पिंपरी: पुण्यातील भारतीय प्राणी सर्वेक्षण विभागाच्या पश्चिम प्रादेशिक केंद्राने नियोसेरिका (Neoserica) वंशातील एका नव्या भुंग्याच्या प्रजातीचा शोध लावला आहे. या प्रजातीला नियोसेरिका आकुर्डी कलावटे, 2025 (Neoserica akurdi Kalawate, 2025) असे नाव देण्यात आले आहे. ही प्रजाती पुणे जिल्ह्यातील आकुर्डी येथील भारतीय प्राणी सर्वेक्षणाच्या परिसरातून आढळली आहे. या संशोधन पथकात डॉ. अपर्णा कलावटे, पूजा कुमार मिसाल आणि नॅन्सी सुप्रिया यांचा समावेश आहे. हा संशोधन लेख रेकॉर्ड्स ऑफ़ द झूलॉजिकल सर्वे ऑफ़ इंडिया या शास्त्रीय नियतकालिकात प्रकाशित झाला आहे.
स्काराबेइडे (Scarabaeidae) कुलातील भुंगे पर्यावरणीय दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. काही गोबरावर उपजीविका करणारे, काही वनस्पतीभक्षक, काही मृतजीवांवर तर काही कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांवर उपजीविका करणारे आहेत. मेलोलोन्थिनी (Melolonthinae) या उपकुलातील बहुतांश भुंगे वनस्पतीभक्षक (phytophagous) असून अनेकदा शेती व बागायती पिकांवर कीड म्हणून हानिकारक ठरतात. नवी प्रजाती देखील याच गटात मोडते आणि पिकांवर संभाव्य कीड म्हणून परिणाम करू शकते.
सेरिसिन चाफर भुंगे उपकुल मेलोलोन्थिनी व जमात सेरिसिनी (Sericini) मध्ये मोडतात. जगभरात याच्या 4,600 हून अधिक प्रजाती ज्ञात असून, त्यापैकी सुमारे 700 भारतात आढळतात. नियोसेरिका वंशातील सुमारे 200 प्रजाती ज्ञात असून त्याचे वर्गीकरण गुंतागुंतीचे मानले जाते. हे भुंगे आकाराने लहान व रंगाने साधारणपणे तपकिरी ते काळे असतात. फक्त बाह्य संरचना पाहून प्रजाती ओळखणे कठीण असल्याने नर जननेंद्रियांचा अभ्यास करणे अत्यावश्यक असते. नियोसेरिका आकुर्डी ही नवी प्रजाती आकुर्डी परिसरातून संकलित केलेल्या व पुणे केंद्रातील संग्रहात उपलब्ध नमुन्यांच्या सखोल अभ्यासावरून निश्चित करण्यात आली आहे.
आकुर्डीतील दुसरे संशोधन
ही आकुर्डी परिसरातून डॉ. अपर्णा कलावटे यांनी शोधलेली दुसरी नवी प्रजाती आहे. यापूर्वी येथेच एक टायगर पतंग ओलेपा झेडेसाय कलावटे, 2020 (Olepa zedesi Kalawate, 2020) याची नवी प्रजाती आढळली होती.
कीड व्यवस्थापनाच्या दृष्टीने शोधाचे महत्त्व
भारताच्या अनेक भागांत हे वनस्पतीभक्षक भुंगे अद्याप अल्प-अभ्यासित आहेत किंवा फक्त जुन्या नोंदींमध्येच ज्ञात आहेत. त्यांच्या अळ्या (white grubs) पिकांच्या मुळांवर उपजीविका करून उत्पादन घटवतात, तर प्रौढ भुंगे पाने व फुले खातात. त्यामुळे या गटातील प्रजातींचे दस्तावेजीकरण आणि अचूक ओळख करणे हे पीक संरक्षण, कीड व्यवस्थापन आणि जैवविविधता संवर्धनासाठी अत्यंत आवश्यक आहे. हा शोध भारतातील स्कॅराब भुंग्यांच्या समृद्ध पण कमी अभ्यासलेल्या विविधतेवर प्रकाश टाकतो व वर्गीकरणशास्त्रीय (taxonomic) संशोधनाचे महत्त्व अधोरेखित करतो.
नवी प्रजाती साधारणपणे जंगल, पर्वतरांग किंवा दूरवरच्या भागांत आढळते असे मानले जाते. पण आकुर्डी सारख्या शहरी परिसरातून ही नवी प्रजाती सापडणे हे विलक्षण आहे. या शोधामुळे शहरी अधिवासातही जैवविविधतेचा खजिना दडलेला आहे हे स्पष्ट होते. शहरांच्या विकासाबरोबरच तेथील निसर्ग व पर्यावरणाचे जतन करणे किती महत्त्वाचे आहे याची जाणीव या शोधामुळे होते. भारतीय प्राणी सर्वेक्षण, पुणे केंद्र हे केवळ संशोधनापुरते मर्यादित नसून जैवविविधतेच्या संवर्धनासाठी सक्रिय योगदान देत आहे. या नव्या प्रजातीच्या शोधामुळे केंद्राच्या कार्याला नवा आयाम मिळाला आहे.
-डॉ. अपर्णा कलावटे, शास्त्रज्ञ, भारतीय प्राणी सर्वेक्षण, पुणे