
राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यात वसलेले पिप्लांत्री हे गाव आज जागतिक स्तरावर पर्यावरण संवर्धन आणि स्त्री सक्षमीकरणाचा एक अद्भुत संगम म्हणून ओळखले जाते. पूर्वी ज्या प्रदेशात मुलीच्या जन्माला एक सामाजिक भार मानले जात असे, तिथे आज प्रत्येक मुलीच्या जन्माचे स्वागत हरित क्रांतीच्या उत्सवासारखे केले जाते. ‘वृक्ष-कन्या’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मॉडेलने केवळ गावाची निसर्गसंपदा वाढवली नाही, तर मुलींच्या सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्याची पायाभरणीही केली आहे.
The Royal Rajputana Classic Rally: राजस्थानच्या ऐतिहासिक गाड्यांचा आणि राजेशाही वारशाचा अनोखा उत्सव
या प्रेरणादायी चळवळीची सुरुवात २००६ मध्ये गावाचे माजी सरपंच श्यामसुंदर पालीवाल यांनी केली. आपल्या तरुण कन्येच्या अकाली मृत्यूनंतर तिच्या स्मृती जपण्यासाठी त्यांनी गावात झाडे लावण्यास सुरुवात केली. पुढे या वैयक्तिक दुःखाचे रूपांतर त्यांनी एका व्यापक सामाजिक उपक्रमात केले आणि संपूर्ण गावाला या हरित मोहिमेत जोडून घेतले.
या मॉडेलची कार्यपद्धती अतिशय नियोजनबद्ध आहे. गावात जेव्हा एखाद्या मुलीचा जन्म होतो, तेव्हा ग्रामस्थ आणि कुटुंबीय मिळून १११ फळझाडांची लागवड करतात आणि त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घेतात. यासोबतच, मुलीच्या आर्थिक सुरक्षेसाठी ग्रामस्थ व नातेवाईक मिळून २१,००० रुपये जमा करतात आणि पालकांकडून १०,००० रुपये घेतले जातात. हे एकूण ३१,००० रुपये मुलीच्या नावे १८ वर्षांसाठी फिक्स डिपॉझिट म्हणून बँकेत ठेवले जातात. मुलीला १८ वर्षांआधी विवाहबद्ध न करणे, तिला नियमित शाळेत पाठवणे आणि लावलेल्या झाडांची काळजी घेणे याबाबत पालकांकडून कायदेशीर शपथपत्र घेतले जाते.
‘या’ गावात कुत्रा, मांजरी नाही तर बिबट्याला पाळतात, असं एक गाव जिथे बिबट्या आणि माणसं एकत्र राहतात
या उपक्रमामुळे गावात सामाजिक आणि पर्यावरणीय बदल घडून आला आहे. कन्याभ्रूणहत्या आणि बालविवाह यांसारख्या प्रथांना समूळ नष्ट करण्यात यश मिळाले असून मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे, आतापर्यंत लावलेल्या लाखो झाडांमुळे परिसरातील भूजल पातळी वाढली असून ओसाड जमीन हिरवीगार झाली आहे. पिप्लांत्रीचे हे ‘वृक्ष-कन्या’ मॉडेल जगाला दाखवून देते की योग्य विचारांच्या बळावर निसर्ग आणि मानवी मूल्यांचे रक्षण एकाच वेळी शक्य आहे.