फोटो सौजन्य: iStock
महाराष्ट्राच्या मातीत अनेक महापुरुषांनी जन्म घेतले. मात्र, आज महाराष्ट्र ज्यांच्या नावाने आणि कीर्तीमुळे ओळखला जातो, अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा 352 वा राज्याभिषेक सोहळा संपूर्ण महाराष्ट्र साजरा करतोय. शिवराय म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजे शिवराय !
अनेक वर्षांपासून महाराजांचे चरित्र नेहमीच भरकटलेल्या आयुष्यांना नवी दिशा देत आहे. महाराजांच्या चरित्रातून कित्येक महापुरुषांनी प्रेरणा घेतली आहे. खऱ्या अर्थाने शिवराय म्हणजे महापुरुषांचे मेरुमणी आहेत. शिवराय जन्मले आणि अवघ्या महाराष्ट्रासह भारताचा इतिहास बदलला. याच इतिहासातील सुवर्ण दिवस म्हणजे शिवराज्याभिषेक दिन, जो शके 1596 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी अर्थात इंग्रजी कॅलेंडरनुसार 6 जून 1674 रोजी झाला.
Dinvishesh : मराठी माणसांचा स्वप्नपूर्ती दिन शिवराज्याभिषेक सोहळा; जाणून घ्या 06 जूनचा इतिहास
भारतात तर नेहमीच शिवरायांना आदराचे स्थान मिळाले आहे. मात्र, भारताचा शत्रू असणाऱ्या पाकिस्तनाच्या पाठ्यपुस्तकात शिवरायांबद्दल काय सांगितले जाते? चला याबद्दल जाणून घेऊयात.
शिवरायांनी अवघ्या 14 व्या वर्षी स्वराज्याची स्थापना करण्याचा निश्चय केला. हाच निश्चय पुढे चालवता मराठा साम्राज्य पाकिस्तान तसेच अफगाणिस्थान पर्यंत पसरले गेले. खरंतर, पाकिस्तानच्या शाळांमधील अभ्यासक्रमात खासकरून पंजाब स्टेट बोर्डाच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये प्रामुख्याने इस्लामच्या इतिहासावर जास्त भर दिला जात आहे.
पाकिस्तानातील पाचवी ते सातवीपर्यंतच्या मुलांना इस्लामाच्या इतिहासासह मुस्लिम राजवटीची माहिती देण्यात येते. यानंतर भारतात पूर्वी अस्तित्वात असणाऱ्या ब्रिटिश राजवटीचा उल्लेख करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या शालेय आणि स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याचा उल्लेख केला जातो. मात्र तो इतकाही आढळत नाही.
पाकिस्तानच्या Central Superior Service(CSS) परीक्षेच्या अभ्यासासाठी वापरल्या जाणाऱ्या पुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा थेट उल्लेख आढळत नाही. या पुस्तकांमध्ये 1760 मध्ये अहमदशहा अब्दालीने मराठ्यांचा पराभव केला आणि त्यामुळे मराठा साम्राज्याचा अस्त झाला, असे म्हटले आहे.
पाकिस्तानी लेखक हमीद खान यांच्या कॉन्स्टिट्यूशनल अँड पॉलिटिकल हिस्टरी ऑफ पाकिस्तान या पुस्तकात, औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठे एक नवी शक्ती म्हणून उदयास आले, असे नमूद करण्यात आले आहे.
तसेच, पाकिस्तानातील लेखक के. अली यांनी लिहिलेल्या The New History of Indo-Pakistan after 1526 या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचे चांगले वर्णन करण्यात आले असून यात महाराजांना The Constructive Genius of Hindu India असे संबोधण्यात आले आहे.