
Women Safety Pune, Nasrapur Incident, Navale Bridge Protest, POCSO Act, Molestation Cases,
शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली. नराधमाने तिच्यावर अत्याचार केल्यानंतर तिची हत्या केली. या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली. नराधमाच्या या कृत्याने लोकांच्या संयमाचा बांध सुटला. या क्रूर घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपीला तात्काळ फाशी देण्याच्या मागणीसाठी शनिवारी रात्री हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. मुंबई-पुणे महामार्गावरील नवले ब्रिज परिसरात संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. “आरोपीला आमच्या स्वाधीन करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
Nasrapur Crime News: नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेची गुन्ह्याची कबुली
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पालकमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी स्वतः घटनास्थळी धाव घेत आंदोलकांशी संवाद साधला. “कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल आणि खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल,” असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
नसरापूरची ही घटना केवळ अपवाद नाही, तर २०२५ पासून सुरू असलेल्या भीषण मालिकेतील एक पुढचा भाग आहे. २०२५ मधील आकडेवारीवर नजर टाकली तर असे दिसते की, पुणे शहर आणि जिल्ह्यात महिला व बालकांवरील अत्याचारांच्या घटनांचे प्रमाण गंभीर आहे.
बलात्कार आणि पोक्सो: पुणे शहरात वर्षभरात ४७३ बलात्काराच्या घटना घडल्या, तर पिंपरी-चिंचवडमध्ये या गुन्ह्यांमध्ये १५% वाढ नोंदवण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, पिंपरी-चिंचवडमधील जवळजवळ सर्वच प्रकरणांमध्ये आरोपी हे पीडितेच्या ओळखीचे होते. पुणे ग्रामीण भागात पोक्सो (POCSO) अंतर्गत ३११ गुन्हे नोंदवले गेले. यामध्ये उरसे (मावळ) येथील ५ वर्षांच्या मुलीची हत्या आणि शिरूरमधील आईसह दोन चिमुकल्यांना जिवंत जाळल्यासारख्या घटनांनी माणुसकीचा थरकाप उडवला होता.
Nasrapur crime News: नसरापूर प्रकरणात मोठी अपडेट; राज्य महिला आणि बाल हक्क आयोगाकडून दखल
एकीकडे गुन्हेगारी वाढत असताना, दुसरीकडे न्यायव्यवस्थेवरील ताणही वाढत आहे. नोव्हेंबर २०२५ पर्यंत पुणे जिल्ह्यात ६,५३७ पोक्सो प्रकरणे प्रलंबित होती. न्याय मिळण्यास होणारा विलंब हा गुन्हेगारांचे मनोबल वाढवणारा ठरत आहे. मार्च २०२६ मध्ये सरकारने मंजूर केलेल्या ‘शक्ती विधेयकामुळे’ (दुरुस्ती) आता अल्पवयीन मुलींवरील अत्याचार आणि हत्येसाठी ‘फाशीच्या शिक्षेची’ तरतूद करण्यात आली आहे.
नुकतेच एप्रिल २०२६ मध्ये पुणे सत्र न्यायालयाने एका ४८ वर्षीय नराधमाला ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी २० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तसेच हडपसरमधील कुंडलिक जाधव यालाही दोन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी २० वर्षांची शिक्षा झाली आहे. २०२५ मध्ये पुणे सत्र न्यायालयाने ६६ आरोपींना विविध गंभीर गुन्ह्यांत दोषी ठरवून अद्दल घडवली आहे.
केवळ मेणबत्त्या पेटवून किंवा आंदोलने करून हे थांबणार नाही. समाजात दडलेल्या अशा विकृत मानसिकतेच्या कीड लागलेल्या माणसांना कायद्याचा धाक असणे गरजेचे आहे. नसरापूरच्या त्या चिमुकलीचे रक्त ओरडून सांगत आहे की, आता ‘तारीख पे तारीख’ नको, तर नराधमांना थेट फासावर लटकवा. जर ‘शक्ती कायदा’ कागदावरून उतरून प्रत्यक्षात आला आणि जलदगती न्यायालयात निकाल लागले, तरच भविष्यात कोणत्याही चिमुकलीचा असा बळी जाणार नाही.
पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलीस दलाने २०२५ सालातील वार्षिक गुन्हेगारीचा आढावा प्रसिद्ध केला आहे. या आकडेवारीनुसार, संपूर्ण जिल्ह्यात महिला आणि बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांचे प्रमाण चिंताजनक असल्याचे दिसून येत आहे. तिन्ही विभागांमध्ये ‘पोक्सो’ (POCSO) आणि महिलांवरील विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
| गुन्ह्याचा प्रकार | पुणे शहर | पिंपरी-चिंचवड | पुणे ग्रामीण |
| बलात्कार / पोक्सो | ४७३ | ३०१ | ३११ |
| विनयभंग / महिला अत्याचार | ८३६ | ३९२ | १,८२५ |
पुणे शहर: शहरात बलात्काराच्या एकूण ४७३ गुन्ह्यांपैकी २८० गुन्हे महिला व अल्पवयीन मुलींशी संबंधित आहेत. पोक्सो कायद्यांतर्गत गुन्ह्यांमध्ये २५६ वरून ३११ पर्यंत वाढ झाली असून, मुलांच्या छळाच्या घटनांमध्येही तिप्पट वाढ (५ वरून १६) झाली आहे.
पिंपरी-चिंचवड: औद्योगिक पट्ट्यात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली असून हा आकडा ३०१ वर पोहोचला आहे. विनयभंगाचे गुन्हे मागील वर्षाच्या तुलनेत वाढून ३९२ झाले आहेत.
पुणे ग्रामीण: ग्रामीण भागात महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांचे प्रमाण सर्वाधिक (१,८२५ गुन्हे) असून बालविवाहाच्या सामाजिक समस्येवरही पोलिसांनी कारवाई केली आहे. वर्षभरात पोलिसांनी ४३ बालविवाह रोखले, तर मुलांविरुद्धच्या एकूण गुन्ह्यांची संख्या सुमारे ८७८ इतकी आहे.