Teachers Day: "शिक्षण हे ये हृदयीचे ते हृदयी पोहोचले पाहिजे"
सोनाजी गाढवे/पुणे: समाजाशी शिक्षणाला जोडणारे आणि एनएसएस उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा देणारे डॉ. संजय चाकणे हे आज शिक्षणक्षेत्रातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. पुणे जिल्हा शिक्षक मंडळात कारकीर्दीला सुरुवात करून प्राचार्य पदापर्यंतचा प्रवास करताना त्यांनी ‘समर्थ भारत अभियान’सारख्या प्रयोगांतून शिक्षणाचा नवा चेहरा घडवला आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने त्यांनी ‘नवराष्ट्र’शी विशेष संवाद साधत शिक्षक-विद्यार्थी नातं, नवीन शैक्षणिक धोरण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाबाबत आपले विचार मांडले.
शिक्षक म्हणून तुमचा प्रवास कसा होता?
सन १९९० मध्ये एम.एस्सी. फिजिक्स पूर्ण करून दुसऱ्याच दिवशी पुणे जिल्हा शिक्षक मंडळात शिक्षक म्हणून रुजू झालो. विविध संस्थांत काम केल्यानंतर भारतीय जैन संघटना महाविद्यालयात प्राध्यापक आणि एसपीपीयू एनएसएस समन्वयक होतो. इंदापूर कॉलेजला १२ वर्ष प्राचार्य राहून सध्या टी जे कॉलेजचा प्राचार्य आहे. एनएसएस काम करत असताना पुणे ते पंढरपूर दिंडी उपक्रमाला १८ वर्षे पूर्ण झाली असून, “समर्थ भारत अभियान” अंतर्गत अनेक कार्य केले आहेत. त्यांनी ४०० गावांचा इतिहास लिहिला, बॉटनीच्या माध्यमातून १२५ गावांचे फ्लोरा नोंदवले, तर ११० गावे हागणदारीमुक्त केली. याशिवाय दोन लाख मीटर लांबीचा चर घेऊन स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.
एनएसएस सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षक यांना समाजाशी जोडता येऊ शकते का?
राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे नॉट मी बट यू – माझ्यासाठी नव्हे तर समाजासाठी. शिक्षणाचा उद्देश केवळ वर्गात मर्यादित नसून समाजापर्यंत पोहोचवणे हा आहे. राधाकृष्णन, कोठारी, यशपाल आयोग तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांनी चाकोरी बाहेरच शिक्षणाला महत्व दिला आहे. खडू-फळा पद्धती कालबाह्य होत असून राष्ट्रीय सेवा योजना आता अभ्यासक्रमाचा भाग झाला आहे. तिच्या माध्यमातून गाव, विद्यार्थी, प्राध्यापक व महाविद्यालय बदलू शकतात आणि व्यक्तिमत्त्व विकासासोबत समाजाभिमुख शिक्षण घडले.
विद्यार्थी शिक्षक नाते घट्ट करण्यात अशा उपक्रमांचे महत्व काय असते?
शिक्षकांचे प्रकार वेगवेगळे असतात. काही फक्त विषय शिकवून संबंध संपवतात, तर काही समंजसपणे विद्यार्थ्यांशी बोलून त्यांचे मार्गदर्शन करतात. असे शिक्षक मेंटोरिंगची भूमिका निभावतात. विद्यार्थी चुकला तर योग्य वेळी शब्दांनी फटकारतात. या बदलांचा परिणाम कायमस्वरूपी राहतो. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक दोघेही एकमेकांच्या मनात ठसतात आणि त्यांच्यातले नाते अधिक घट्ट व अर्थपूर्ण बनते.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एनएसएसचा कशाप्रकारे उपयोग करता येऊ शकतो. त्या माध्यमातून कोणते नवीन प्रयोग शिक्षण पद्धतीत आणता येतील?
समर्थ भारत अभियान या प्रयोगाचा हेतू म्हणजे शिक्षणाला समाजाशी जोडणे हा होता. रसायनशास्त्र विद्यार्थी पाणी, माती, दूध परीक्षण करतील, भौतिकशास्त्र विद्यार्थी ऊर्जा संवर्धन करतील, फार्मसी विद्यार्थी औषधविषयक जनजागृती करतील, तर अर्थशास्त्र व कॉमर्स विद्यार्थी शेतकऱ्यांना आर्थिक मार्गदर्शन करतील. केवळ सात दिवसांचे शिबिर न करता, राष्ट्रीय सेवा योजनेतून समाजाशी दीर्घकाळ जोडून कार्य करणे, विद्यार्थी व समाज दोघांचाही विकास साधणे आणि राष्ट्रहितासाठी शिक्षण ही संकल्पना रुजवणे हा उद्देश आहे.
नव्या शैक्षणिक धोरणात शिक्षकांची भूमिका नेमकी काय आहे. त्यात शिक्षकांकडून कोणते बदल अपेक्षित आहेत?
नवीन शैक्षणिक धोरण हे उत्तम आहे, मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. यासाठी शिक्षक, विद्यार्थी, पालक, प्राचार्य आणि विद्यापीठ अधिकारी यांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. केवळ धोरण समजणे नव्हे, तर त्याची अंमलबजावणी नीट झाली पाहिजे. प्रयोगाधारित, कौशल्याधारित आणि संशोधनाधारित शिक्षण पद्धतीसाठी शिक्षकांचे प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. अध्यापन हे हृदयातून हृदयापर्यंत पोहोचले पाहिजे, ज्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला शिकवलेले सारखेच समजेल आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण घडेल.
शिक्षणात झपाट्याने होत असलेल्या बदलांना अनुसरून शिक्षकांनी कोणती नवी कौशल्य आत्मसात करायला हवीत?
मराठी शिक्षक म्हणून प्रूफरीडिंग, उत्तम लेखन व वक्तृत्व ही आवश्यक कौशल्ये आहेत. ज्ञानाची निर्मिती होणे हेच शिक्षणाचे खरे उद्दिष्ट आहे. भारत सेमीकंडक्टर निर्मितीत पुढे सरकतोय, यासाठी संशोधन महत्त्वाचे ठरते. कौशल्याधारित शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न पडण्याची वृत्ती, ज्ञानपिपासू वृत्ती आणि सृजनशीलता विकसित होणार आहे.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखी ज्ञानपिपासू वृत्ती विद्यार्थ्यांत निर्माण झाली तर शिक्षणाचे रूपांतर शक्य होईल. हे सर्व एका रात्रीत न घडता टप्प्याटप्प्याने साध्य होईल.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने आजचे विद्यार्थी आणि उद्याच्या शिक्षकांना कोणता संदेश द्याल?
शिक्षकाला केवळ तासावर हजेरी लावायला सांगणे हा अपमान आहे. त्याने वर्गापुरतेच नव्हे तर वर्गा बाहेरही शिकवले पाहिजे, सहल किंवा प्रत्यक्ष स्थळदर्शनाद्वारेही विद्यार्थ्यांना शिकवले पाहिजे. चाकोरीबाहेरचे शिक्षण विद्यार्थ्यांच्या जाणिवा समृद्ध करते. उदाहरणार्थ, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जिथे घडला त्या ठिकाणी नेऊन शिकवले तर शिक्षण अधिक जिवंत आणि प्रभावी ठरेल. असे शिक्षणच विद्यार्थ्यांना घडवून भारताला डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्वप्नाप्रमाणे ‘सुपर पावर’ बनवू शकते.