38th National Games 2025 Maharashtra Wins Silver in Table Tennis at 38th National Games at Uttarakhand
देहरादून : टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पुरुष गटात पश्चिम बंगालच्या बलाढ्य खेळाडूंना चिवट लढत दिली. मात्र, हा सामना ०-३ असा गमवावा लागखाणे ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. परेड मैदानाजवळील इनडोअर स्टेडियम मध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या जश मोदी याने अर्निबन घोष याला चिवट झुंज दिली. मात्र, अखेर त्याने हा सामना ७-११, १२-१०, ११-६, ४-११ असा गमावला.
दोन्ही खेळाडूंचा टॉप स्पिन फटक्यांचा सुरेख खेळ
या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी टॉप स्पिन फटक्यांचा सुरेख खेळ केला. मात्र, अखेर बंगालच्या खेळाडूने बाजी मारली. महाराष्ट्राच्या रेगन अल्बुकर्क याला बंगालच्या आकाश पाल याने ११-५, ११-८, १२-१० असे सहज हरविले. आकाशने काउंटर अटॅक पद्धतीचा बहारदार खेळ केला. महाराष्ट्राच्या चिन्मय सोमय्या याला सौरव शाह याने ११-७, ११-८, ८-११, ११-८ असे पराभूत करीत बंगालच्या विजेतेपदावर मोहोर नोंदविली.
महाराष्ट्र संघाला साखळी गटापासूनच कडवे आव्हान
महाराष्ट्र संघाला साखळी गटापासूनच कडवे आव्हान होते त्यामुळे बाद फेरीत प्रवेश करण्याबाबत आम्ही साशंक होतो परंतु आमच्या खेळाडूंनी प्रत्येक सामन्यात सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरी केली त्यामुळेच आम्हाला अंतिम फेरीपर्यंत धडक मारता आली. अंतिम फेरीत आमच्या खेळाडूंनी चांगले प्रयत्न केले मात्र अखेर बंगालच्या अधिमुक अनुभवी खेळाडूंनी त्यांच्या नावलौकिकास साजेसा खेळ केला, असे महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक महेंद्र चिपळूणकर यांनी सांगितले. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन पथक प्रमुख संजय शेटे, स्मिता शिरोळे, प्रा.सुनील पूर्णपात्रे यांनी महाराष्ट्र संघाच्या खेळाडूंचे रुपेरी कामगिरी बाबत अभिनंदन केले.