टोकियो ऑलम्पिक ही स्पर्धा क्रीडा विश्वात अतिशय प्रतिष्ठेची मानली जाते. मात्र याच स्पर्धेला आता काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. टोकियो ऑलिंपिकमधील आयोजक आणि प्रायोजक यांच्यावर लाचखोरी केल्याचा संशय असून त्या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली आहे.
कोरोना महामारीच्या संसर्ग काळात टोकियो ऑलिंपिकसारख्या भव्यक्रीडा स्पर्धेचे आयोजन यशस्वीपणे केल्यामुळे जपान चे जगभरात कौतुक करण्यात आले होते. मात्र आता याच ऑलम्पिक प्रकरणी धक्कादायक माहिती समोर येत आहे. आयोकी होल्डिंग्स कंपनीचे माजी प्रमुख आणि कंपनीमधील दोन कर्मचाऱ्यांकडून देंतसू या जाहिरात कंपनीचे माजी कार्यकारी अधिकारी हारुयुकी ताकाहाशी यांनी लाच घेतल्याचा संशय आहे.
टोकियो ऑलिंपिकमध्ये जपानच्या खेळाडूंनी या कंपनीचे कपडे परिधान केले होते. याचप्रसंगी इतर देशांतील खेळाडूंनी इतर दिग्गज ब्रॅंडच्या कपड्यांना प्राधान्य दिले होते. जपानच्या खेळाडूंच्या कपड्यांकडे बघितल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. आयोकी हे तरुणांसाठी बनवण्यात येणाऱ्या कपड्यांच्या कंपनीशी जोडलेले आहेत. ॲथलिट परिधान करीत असलेल्या कपड्यांशी त्यांचा काहीही संबंध नाही.
खेळ आणि ऑलिंपिकशी संबंधित उत्पादनांच्या प्रायोजकत्वाशी संबंधित ही लाच घेतल्याचा संशय आहे. ऑलिंपिक समितीतील पदाधिकाऱ्यांमध्ये शीर्षस्थानी असलेल्या व्यक्तीने भ्रष्टाचार केल्याची अफवा फार पूर्वीपासून होती; परंतु या प्रकरणातील ही अटक जपानच्या ऑलिंपिक महत्त्वाकांक्षेला धक्का देणारी आहे. या प्रकरणी आयोजन समितीतील एक सदस्य आणि या क्रीडा महोत्सवासाठीचा प्रायोजक असलेल्या कपड्याच्या कंपनीतील तीन व्यक्तींचा समावेश आहे.
हारुयुकी ताकाहाशी यांनी आरोप फेटाळले:
मी कोणतीही चूक केलेली नाही. मला फक्त सल्लागार सेवांसाठी शुल्क देण्यात आले. अशा प्रकारचे वृत्त प्रसारमाध्यमांमधून समोर आले आहे. दरम्यान, ताकाहाशी यांनी स्थानिक प्रायोजकांद्वारे टोकियो ऑलिंपिकसाठी ३ अब्ज डॉलर्स मिळवले होते.