
Asian Games 2026 : भारतीय महिला हॉकी संघाने उज्बेकिस्तानला रडवले, १९-० अशा एकतर्फी विजयात दीपिकाचे दणादण ८ गोल
भारतीय महिला हॉकी संघाने रविवारी गिफू प्रीफेचुरल ग्रीन स्टेडियममध्ये आपल्या ‘बी’ गटातील पहिल्या सामन्यात उज्बेकिस्तानचा १९-० असा एकतर्फी पराभव करत एशियन्स गेम्स (Asian Games 2026)मधील आपल्या मोहिमेची दणक्यात सुरुवात केली.
भारतीय संघाच्या विजयात दीपिका स्टार खेळाडू ठरली. दीपिकाने दणदणीत ८ गोल केले. तिच्याशिवाय इशिकाने ३, लालथंतलुआंगी आणि नेहाने प्रत्येकी दोन गोल करत स्कोरबोर्ड भारताच्या बाजूनेच झूकता ठेवला. तसेच बलजीत कौर, नवनीत कौर, लालरेमसियामी आणि साक्षी राणा यांनी प्रत्येकी एक गोल करत भारताच्या विजयात आपलाही खारीचा वाटा उचलला.
दीपिकाच्या Hattrick च्या जोरावर भारतीय महिला संघाने जोरदार कामगिरी केली. यामुळेच हाफ-टाइमपर्यंत उज्बेकिस्तान ८-० असे बॅकफूटवर गेले होते. ब्रेकनंतर भारताने उज्बेकिस्तानला गोल करण्याची कोणतीच संधी दिली नाही. दुसरीकडे, उज्बेकिस्तान भारताच्या डिफेंडर्सचा चक्रव्यूहाला भेदू शकले नाही. तर दीपिकाने मात्र उज्बेकिस्तानच्या सर्कलमध्ये प्रवेश करत गोलवर गोल केले. दीपिका चांगल्या फॉर्मात दिसत होती. तिने सलग चार गोल करत भारताची आघाडी १३-० पर्यंत नेली.
दीपिकाच्या आक्रमकतेनंतर संघातील इतर खेळाडूंनाही जोश आला व त्यांनीही उज्बेकिस्तानच्या सर्कलमध्ये प्रवेश करत गोल करण्यास सुरुवात केले. यात इशिका, ललथंतलुआंगी, साक्षी आणि नवनीत यांचा समावेश होता. त्यांनी उज्बेकिस्तानच्या सर्व अपेक्षांवर पाणी फेरले.
दरम्यान, उज्बेकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात सविता पुनिया आपला ३२० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळत होती. ती वंदना कटारियासोबत सर्वात जास्त सामना खेळणारी भारतीय महिला हॉकी संघातील खेळाडू बनली आहे. दुसरीकडे, बलजीत कौरचा आपल्या कारकिर्दीतील हा ५० वा सामना होता.
भारतीय महिला एफआयएच हॉकी महिला वर्ल्ड कप २०२६ मध्ये ऐतिहासिक पाचव्या स्थानी राहिल्यानंतर उत्साहात असून त्यांनी एशियन गेम्सची सुरुवातही दणदणीत केली आहे. एशियन गेम्स हॉकी संघांसाठी लॉस अँजिल्स २०२८ ऑलिम्पिक गेम्समध्ये जागा मिळवण्याचे एक महत्त्वपूर्ण साधन आहे.