फोटो सौजन्य - cricket.com.au
ऑस्ट्रेलियाविरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये तीन सामन्यांचे एकदिवसीय मालिका सुरू आहे. आतापर्यंत या मालिकेचे दोन सामने झाले आहेत आणि या दोन्ही सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने विजय मिळवून मालिका जिंकली आहे. त्या मालिकेचा आज शेवटचा सामना खेळवला जात आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियन संघ नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. याची सुरुवात ऑस्ट्रेलियन संघाचा सलामीवीर फलंदाज ट्रॅव्हिस हेड ज्याने संघाला दमदार सुरुवात करून दिली. आता सामन्याचा पहिला डाव संपला आहे आणि यामध्ये दोन्ही संघांची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात जाणून घ्या.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये निराशाजनक कामगिरी केल्यानंतर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात जोरदार पुनरागमन केले. या पुनरागमनाचे नायक स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेड आणि कर्णधार मिशेल मार्श होते, ज्यांनी आपल्या स्फोटक फलंदाजीने आफ्रिकन गोलंदाजांचे कंबरडे मोडले. नंतर कॅमेरून ग्रीन आणि अॅलेक्स कॅरी यांनीही प्रभाव पाडला. मालिकेतील शेवटच्या सामन्यात ट्रॅव्हिस हेडने केवळ ८० चेंडूत त्याचे सातवे एकदिवसीय शतक पूर्ण केले, जे त्याच्या आक्रमक खेळण्याच्या शैलीचे उत्तम उदाहरण आहे.
ट्रॅव्हिस हेडने त्याच्या डावाच्या सुरुवातीपासूनच वेग दाखवला आणि मैदानावर सर्वत्र फटके मारून चाहत्यांचे मनोरंजन केले. त्याने त्याच्या शतकी खेळीत २२ वेळा चेंडू सीमारेषेबाहेर मारला. हेडच्या बॅटने १७ शानदार चौकार आणि ५ उत्तुंग षटकार मारले. या डावात त्याचा स्ट्राईक रेट १३७.८६ होता. ट्रॅव्हिस हेडच्या या खेळीमुळे संघाचे मनोबल वाढलेच नाही तर मालिकेत सलग दोन पराभवांनंतर ऑस्ट्रेलियाला दिलासा मिळाला. जवळजवळ एक वर्षानंतर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या बॅटमधून शतक आले आहे आणि त्याने दाखवून दिले आहे की तो जगातील सर्वात धोकादायक सलामीवीरांपैकी एक का मानला जातो.
भारताविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेपूर्वी या सामन्यामुळे संघाचे मनोबल निश्चितच वाढेल, कारण येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की ऑस्ट्रेलियन संघ मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये २०० धावांचा टप्पाही ओलांडू शकला नाही. धावांचा पाठलाग करताना त्यांची फलंदाजी सतत अपयशी ठरत होती, परंतु तिसऱ्या सामन्यात संघाने आक्रमक दृष्टिकोन स्वीकारला. प्रत्येक फलंदाजाने जिद्द दाखवली, ज्यामुळे बातमी लिहिण्याच्या वेळेपर्यंत संघ ४०० पेक्षा जास्त धावांच्या मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहे. या सामन्यात संघाने दाखवून दिले की जरी त्यांनी मालिका गमावली असली तरी ते रिकाम्या हाताने परतणार नाहीत.