फोटो सौजन्य - Star Sports सोशल मिडीया
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या उपांत्य फेरीसाठी चार संघ निश्चित झाले आहेत. ग्रुप अ मधून टीम इंडिया आणि न्यूझीलंडने उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला आहे. तर दुसऱ्या गटातून दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीचे तिकीट मिळाले आहे. तथापि, टीम इंडिया कोणत्या संघाचा सामना करेल हे अद्याप निश्चित झालेले नाही. टीम इंडिया सेमीफायनलमध्ये कोणत्या संघाविरुद्ध खेळू शकतो हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
काल दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सामना झाला या सामन्यांमध्ये इंग्लंडच्या संघाला पराभूत करून गुणतालिकेमध्ये ६ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. आज न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. ऑस्ट्रेलिया त्यांच्या गटात दुसऱ्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत, सर्वांच्या नजरा आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यावर खिळल्या आहेत. आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे, आजच्या सामन्यांमध्ये जो संघ विजयी होईल तो संघ ऑस्ट्रेलियाशी लढणार आहे आणि जो संघ पराभूत होईल तो संघ दक्षिण आफ्रिकेशी भिडेल.
तथापि, हा सामना जिंकल्यानंतर, टीम इंडियाने आपला लीग सामन्याचा प्रवास अव्वल स्थानावर राहून संपवला पाहिजे. न्यूझीलंड आणि भारताच्या संघाने आतापर्यत चॅम्पियन ट्रॉफीच्या स्पर्धेमध्ये एकही सामना गमावलेला नाही त्यामुळे दोन्ही संघ विजयी होण्याच्या इराद्यानेच आज मैदानामध्ये उतरतील. भारतीय संघ जिंकला तर तो गट अ मध्ये अव्वल स्थानावर राहील. अशा परिस्थितीत, त्यांना मंगळवारी दुबईमध्ये ग्रुप बी मधील दुसऱ्या क्रमांकाच्या संघ ऑस्ट्रेलियाशी सामना करावा लागेल.
त्यानंतर दुसरा उपांत्य सामना बुधवारी लाहोरमध्ये दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाईल. जर भारताने शेवटचा साखळी सामना गमावला तर त्यांना शेवटच्या चारमध्ये गट ब मधील नंबर एक संघ दक्षिण आफ्रिकेशी सामना करावा लागेल. अशा परिस्थितीत, दुसरा उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये होईल. भारतीय संघ पाकिस्तानला जात नसल्याने, ही स्पर्धा यजमान पाकिस्तान आणि दुबईमध्ये हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवली जात आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेने त्यांचे सर्व सामने पाकिस्तानमध्ये खेळले पण ते त्यांचा उपांत्य सामना कोणाविरुद्ध खेळतील हे अद्याप निश्चित झालेले नाही, म्हणूनच त्यांना दुबईला यावे लागले.
एका संघाला मंगळवारी दुबईमध्ये सामना खेळावा लागणार आहे. रविवारी दोन्ही सामन्यांसाठी प्रतिस्पर्ध्यांचा निर्णय झाल्यानंतर, यापैकी एका संघासाठी सोमवारी दुबईला जाणे आणि मंगळवारी उपांत्य फेरी खेळणे सोपे राहणार नाही. ऑस्ट्रेलियन संघ शनिवारी रात्री येथे पोहोचला आहे तर दक्षिण आफ्रिका रविवारी दुपारी येथे पोहोचू शकते. यापैकी एका संघाला २४ तासांच्या आत पाकिस्तानला परतावे लागेल.